‘मुलाने गाडी मागितली तर चालवायला दे’ - विशाल अगरवालने सूचना दिल्याची चालकाची जबाबामध्ये कबुली
मुलाने गाडी चालवायला मागितली, तर त्याला गाडी चालवायला दे. तू त्याच्या बाजूला बस, अशी सूचना विशाल अगरवाल यांने आपल्याला दिली होती असे चालकाने आपल्या जबाबात स्पष्ट केले आहे.
भरधाव वेगाने गाडी चालवून दोघांच्या भीषण मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपीच्या वडीलांना आणि ज्या पबमध्ये मद्यपान दिले त्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना बुधवारी (ता. २२) सत्र न्यायाधीश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल (वय ५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ब्लॅक पबचा कर्मचारी नितेश धनेश शेवानी (वय ३४ रा. एन आय बी एम) आणि जयेश सतीश गावकर (वय २३, रा. केशवनगर) यांना अटक केली आहे. सुनावणीनंतर तीनही आरोपींना न्यायालयाने २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे
गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी पोर्शे कारमधील चालकाचा जबाब नोंदवला होता. या जबाबात चालकाने असे स्पष्ट केले आहे की, आरोपीचे वडील विशाल अगरवाल यांनी आपल्याला सूचना केली होती की, मुलाने जर गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी दे आणि तू बाजूला बस. या सूचनेनुसार त्याने मुलाला गाडी चालवायला दिली होती.
अल्पवयीन मुलगा ज्या हॉटेल, क्लबमध्ये पार्टीसाठी जाणार आहे, त्या हॉटेल, क्लबमध्ये दारू मिळते याची माहिती अगरवाल यांना होती. असे असूनही त्यांनी मुलाला पार्टीला जाऊ दिले. पार्टीसाठी जाताना त्याला पॉकेटमनी दिला होता का? पार्टीसाठी अल्पवयीन मुलाला नेमके किती पैसे दिले होते किंवा स्वतःचे क्रेडीट कार्ड वगैरे दिले होते काय? अल्पवयीन मुलासोबत पार्टीसाठी कोण कोण होते? या बाबत आरोपीकडे सखोल तपास करून पुरावे हस्तगत करायचे आहेत. त्यासाठी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील विद्या विभूते आणि योगेश कदम यांनी केला. गावकर आणि शेवानी यांनी आरोपी अल्पवयीन आहे की नाही, याची तपासणी न करता त्यांना मद्यपान करण्याची परवानगी दिली, असे ॲड. विभुते यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपींच्यावतीने ॲड. सुधीर शहा, ॲड. अमोल डांगे आणि ॲड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने तीनही आरोपींना २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिघांनाही येरवडा पोलिस ठाण्यातील कोठडी ठेवण्यात येणार आहे.
अगरवालवर शाईफेक
या प्रकरणातील आरोपीचे वडिल विशाल अगरवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अगरवाल याला पोलीसांनी छत्रपती संभाजीनगर येथे ताब्यात घेतल्यानंतर बुधवारी कोर्टात (दिं. २२) हजर केले. अगरवाल याला कोर्टात आणताच त्याच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न झाला. अगरवालला घेऊन आलेल्या पोलीस व्हॅनवर शाई फेकण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत अगरवाल न्यायालयात नेले. याप्रकरणी वंदे मातरम संघटनेच्या पाच ते आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
अगरवालने मोबाईल लपवला
अगरवाल यांना मंगळवारी (ता. २१) पोलिसांनी संभाजीनगर येथून अटक केली आहे. अटकेतनतर त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक साधा मोबाईल आढळला. त्यातील सिम कार्ड हे १९ मे ला नोंदवले आहे. अगरवाल यांनी त्याचा मूळ मोबाईल लपून ठेवला आहेत. त्यात या गुन्ह्याच्या अनुषंगाने काही पुरावे असू शकतात असे पोलिसांनी नमूद केले.
पोलिसांना चुकीची माहिती
गुन्हाचा तपास सुरू असताना पोलिसांनी अगरवाल यांना फोन करून, ते कुठे आहेत याची माहिती विचारली होती. तेव्हा ते पुण्यात असतानाही त्यांनी आपण शिर्डीला असल्याची खोटी माहिती दिली होती, असे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक गणेश माने यांनी न्यायालयात सांगितले.
‘पोर्शे’चा दावा ग्राहक न्यायालयात
अपघातग्रस्त मोटार ही बंगळूरमधून खरेदी करण्यात आली होती. या मोटारीत तांत्रिक बिघाड असल्याचे अगरवाल यांच्या निदर्शनास आले होते. गाडीतील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून देण्याबाबत त्यांनी कंपनीशी वेळोवेळी संपर्क साधला होता. मात्र कंपनीने त्याची दखल न घेतल्याने अगरवाल यांनी दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली होती. तेथे दाखल असलेली तक्रार अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे गाडीची अद्याप नोंदणी करण्यात आलेली नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला. मात्र त्यावर सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला. गाडीत तांत्रिक बिघाड आहे होता,तर ती गाडी मुलाला चालवण्यासाठी का दिला? असा सवाल उपस्थित करत गाडीबाबतची पूर्वकल्पना असतानाही त्याला ती चालवयला देणे गंभीर आहे, असे ॲड. विभुते यांनी न्यायालयात सांगितले.