कल्याणी कुटुंबातील संपत्तीचा वाद कोर्टात

देशातील मोठा उद्योग समूह असलेल्या भारत फोर्ज कंपनीचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबातील वाद न्यायालयात गेला आहे. बाबा कल्याणी यांच्या विरोधात त्यांचे भाचे समीर हिरेमठ आणि भाची पल्लवी स्वादी यांनी पुण्याच्या दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे.

संग्रहित छायाचित्र

भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या विरोधात भाच्यांची याचिका, आईलादेखील केले प्रतिवादी; भारत फोर्ज आणि कल्याणी स्टीलमधील स्टेकसह मागितला कौटुंबिक मालमत्तेतील एक नवमांश हिस्सा

देशातील मोठा उद्योग समूह असलेल्या भारत फोर्ज कंपनीचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबातील वाद न्यायालयात गेला आहे. बाबा कल्याणी यांच्या विरोधात त्यांचे भाचे समीर हिरेमठ आणि भाची पल्लवी स्वादी यांनी पुण्याच्या दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे.

या दोघांनी कौटुंबिक मालमत्तेतील एक नवमांश हिस्सा भारत फोर्ज आणि कल्याणी स्टीलमधील स्टेकसह मागितला आहे. यापूर्वी बाबा कल्याणी (Baba Kalyani) यांच्या विरोधात त्यांची धाकटी बहीण सुगंधा हिरेमठ (Sugandha Hiremath) आणि पुतणी शितल कल्याणी (Shital Kalyani) यांनीही दावा दाखल केलेला आहे. विशेष म्हणजे समीर हिरमेठ यांनी त्यांची आई सुगंधा हिरेमठ यांच्या विरोधातही तक्रार केली आहे. त्याचबरोबर गौरीशंकर कल्याणी, त्यांची मुले शीतल कल्याणी आणि विराज कल्याणी आणि बाबा कल्याणी यांचा मुलगा अमित कल्याणी यांच्यासह कुटुंबातील इतर पाच सदस्यांविरुद्धही तक्रार केली आहे.  

देशातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत बाबा कल्याणी यांचे नाव आहे.  फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार  त्यांची एकूण संपत्ती चार अब्ज डॉलर आहे. या कुटुंबाकडे पुणे, महाबळेश्वर आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी जमीन आहे, ज्याची किंमत अद्याप निश्चित झालेली नाही.कल्याणी समूहाच्या कंपन्यांचे मार्केट कॅप अंदाजे ६२,८३४ कोटी रुपये आहे. समीर (वय ५०) आणि पल्लवी (वय ४८) यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे की, फेब्रुवारी २०२३ मध्ये नीळकंठ कल्याणी यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर बाबा कल्याणी यांनी त्यांच्या विविध इच्छांची अंमलबजावणी करण्यास नकार दिला. बाबा कल्याणी हे कल्याणी कुटुंबाच्या सर्व मालमत्ता ताब्यात घेतील आणि त्यांचे शेअर्स हिरावून घेतील, अशी भीती याचिकाकर्त्यांना आहे.

याचिकेत म्हटले आहे की निळकंठ कल्याणी यांचे वडील अण्णाप्पा कल्याणी हे शेतकरी आणि व्यापारी होते. त्यांच्याकडे प्रचंड मालमत्ता होती. ही मालमत्ता त्यांचा एकुलता एक मुलगा नीलकंठ यांना वारसाहक्काने मिळाली. 

फेब्रुवारी १९५४ मध्ये नीलकंठ यांनी सर्व मालमत्ता ज्यामध्ये स्वत: कमावलेली आणि गुंतवलेली आहे, ती  हिंदू अविभक्त कुटुंब कायद्याअंतर्गत आणली. २०११ मध्ये त्यांची तब्येत बिघडू लागली तेव्हा त्यांचा मोठा मुलगा बाबा कल्याणी कुटुंबाचे कर्ते झाले. नीलकंठ कल्याणी यांचे २०१३ मध्ये निधन झाले. बाबा कल्याणी यांनी भारत फोर्ज कंपनीला ऑटो आणि एरोस्पेस निर्मितीत आघाडीची कंपनी बनविले. 

या कंपनीचे बाजारमूल्य ५२,६३६ कोटी रुपये झाले आहे. मात्र, हे सर्व व्यवसाय आणि गुंतवणूक कौटुंबिक निधीतून सुरू केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे सर्व व्यवसाय आणि गुंतवणूक ही संयुक्त कुटुंबाची मालमत्ता असल्याने त्यावर एकट्या बाबांचा अधिकार नव्हता आणि असू शकत नाही.वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मिळावा, अशी मागणी करत शीतल कल्याणी यांनी २०१४ मध्ये बाबा कल्याणी यांच्याविरुद्ध पुण्याच्या दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला होता. हे प्रकरण सध्या प्रलंबित आहे. समीर आणि पल्लवी यांनी केलेल्या दाव्यानुसार अविभक्त कल्याणी कुटुंबाकडे उपलब्ध माहितीपेक्षा जास्त मालमत्ता आहे.  सोने आणि दागिन्यांसह त्या सर्व मालमत्ता कुटुंबाच्या संपत्तीचा भाग आहेत. ही सर्व संपत्ती उघड करावी, अशी मागणी समीर हिरेमठ आणि पल्लवी स्वादी यांनी केली आहे. (Bharat Forge)

बाबा कल्याणी यांनी फेटाळले आरोप

दरम्यान, भारत फोर्ज कंपनीच्या जनसंपर्क विभागाकडून करण्यात आलेल्या खुलाशात म्हटले आहे की, याचिकाकर्त्यांचे दावे  बाबा कल्याणी, त्यांचे कुटुंब आणि उद्योगसमूह यांची प्रतिमा खराब करण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहेत. हे आरोप निराधार आणि वस्तुस्थितीशी विसंगत असल्याने हे आरोप स्पष्टपणे नाकारतो आहेत.  याचिकाकर्त्यांनी यंदा २० मार्च रोजी पुणे न्यायालयात दावा दाखल केला.  प्रकरण न्यायालयात सुनावणीसाठी दाखल होण्याआधीच ते प्रसिद्धीला देणे हे धक्कादायक आहे. त्यातून कल्याणी कुटुंब आणि उद्योगसमुहाची प्रतिमा डागाळण्याचा हेतू स्पष्ट दिसत आहे. न्यायालयात कल्याणी कुटुंब याबाबत आपली भूमिका मांडणार आहे.

सुगंधा हिरेमठ यांचाही बाबा कल्याणी यांच्यासोबत वाद

समीर हिरेमठ आणि पल्लवी स्वादी यांनी आई सुगंधा हिरेमठ यांच्याविरोधातही तक्रार केली असली तरी सुगंधा हिरेमठ आणि बाबा कल्याणी या बहीण-भावांचाही वाद आहे. ‘हिकल’ या रासायनिक कंपनीच्या मालकीवरून हा वाद आहे. २०२३ मध्ये सुगंधा हिरेमठ आणि त्यांच्या पतीने हिरेमठ कुटुंबाला ‘हिकल’चे शेअर्स हस्तांतरित केले नाही, म्हणून बाबा कल्याणी यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. २०१४ मध्ये बाबा कल्याणी यांच्या पुतणी शीतल कल्याणी यांनीही कुटुंबाच्या होल्डिंग्ज आणि मालमत्तेत  हिस्सा मिळावा म्हणून विभाजनाची मागणी केली. शीतल कल्याणी या बाबा कल्याणी यांचा भाऊ गौरीशंकर यांच्या कन्या आहेत. दोन्ही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest