हेल्मेटसक्तीसाठी युक्ती, कंपन्यांत होणार सक्ती !
हेल्मेट सक्तीची मोहीम राबविल्यास नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याने आता पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नवीन युक्ती शोधली आहे. आता सर्व कंपन्या आणि कार्यालयांमध्ये दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे बंधनकारक केले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने शिवाजी नगर येथील एका कंपनीला नोटीस पाठविली आहे. त्यामध्ये अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूबाबत जनजागृती केली आहे. या नोटिशीत म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यात सन २०२२ व २०२३ मध्ये घडलेल्या अपघातांचे तुलनात्मक विश्लेषण केले असता एकूण रस्ते अपघातांमध्ये दुचाकी व पादचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ७० ते ८० टक्के अपघात हे फक्त दुचाकी व पादचाऱ्यांचे आहेत. ही बाब रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्वाचे आहे.
बहुतांशी दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात असे दिसून आले आहे. त्यामुळे हेल्मेट वापरण्यासंबंधी प्रबोधनात्मक व अंमलबजावणीविषयक व्यापक मोहीम पुणे जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. अपघातांची चिंताजनक आकडेवारी लक्षात घेऊन आरटीओने पुण्यातील रस्त्यावर हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे. आरटीओने कंपन्यांना सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने हेल्मेटशिवाय कंपनीच्या परिसरात प्रवेश करणाऱ्या लोकांची यादी सादर करण्यास सांगितले आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी ‘सीविक मिररशी बोलताना सांगितले की, पुणे जिल्ह्यातील सर्व कंपन्या आणि आस्थापनांना हेल्मेट सक्तीसाठी नोटिसा बजावत आहोत. गेल्या तीन महिन्यांपासून नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. याचे उल्लंघन केल्यास दंड आकारला जाईल. त्याचबरोबर मोटार वाहन कायद्याच्या कलम १२९ आणि १९४ (ड) अंतर्गत कारवाई केली जाईल.
येरवड्यातील कॉमर्स झोनमध्ये काम करणाऱ्या एका बीपीओ कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, आम्हाला हेल्मेटशिवाय कंपनीच्या आवारात प्रवेश दिला जात नाही. आरटीओचे हे पाऊल स्वागतार्ह आहे. बहुतांश कर्मचारी त्यांचे पालन करतील.
सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर म्हणाले, “आरटीओ अधिकाऱ्यांनी आधी शहरातील वाहतुकीच्या मूलभूत समस्या सोडवण्याची गरज आहे. हेल्मेट सक्ती करण्यापूर्वी वाहतूक कोंडी आणि अरुंद रस्ते यासारख्या समस्या सोडवाव्यात. प्रवाशांसाठी अत्यंत धोकादायक असणारे ओव्हरलोड ट्रक रस्त्यावर धावत असतात. हे सगळे सोडून आरटीओ हेल्मेटसक्तीच्या मागे लागले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.