संग्रहित छायाचित्र
पुणे : पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात बुधवारी सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत वैमानिक, एक अभियंत्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली. हे हेलिकॉप्टर मुंबईमधील जुहूच्या दिशेने निघाले होते. ऑक्सफर्ड काऊंटी या रिसॉर्टमधून उड्डाण केल्यानंतर काहीवेळातच हेलिकॉप्टर दरीत कोसळले.
हा भाग डोंगराळ आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर धुके होते. त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. अपघात झाल्यानंतर हेलिकॉप्टरने लगेच पेट घेतला आणि त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. बावधन बुद्रुकमधील ऑक्सफर्ड काऊंटी आणि एच.ई.एम.आर. एल. संस्था येथील दरीत हे हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगन्यात आले. मुळशीचा हा सगळा परिसर डोंगराळ आहे. पुण्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरी डोंगराळ भागात मोठ्याप्रमाणावर धुके आहे. याच धुक्यामुळे हेलिकॉप्टरच्या वैमानिकाचा अंदाज चुकला असावा आणि हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा अंदाज वर्तवविला जात आहे.
हिंजवडी पोलिसांच्या कंट्रोल रुमला या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, पोलीस आणि इतर यंत्रणा बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत.
सुनील तटकरे बचावले
तटकरे यांनी काल या हेलिकॉप्टरने पुण्यातून मराठवाड्यात प्रवास केला होता. आजही हे हेलिकॉप्टर तटकरे यांनी घ्यायला जाणार होते. त्यापूर्वी हा अपघात घडला.