हेलिकॉप्टर अपघातांची नेत्यांना धडकी

मागील काही दिवसांत पुणे आणि आसपासच्या परिसरात हेलिकॉप्टर दुर्घटना घडण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. कधी तांत्रिक बिघाडामुळे तर कधी दाट धुक्यामुळे... कधी मुसळधार पावसामुळे तर कधी वैमानिकाच्या चुकीमुळे हेलिकॉप्टर ‘क्रॅश’ होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत.

Helicopter accidents

हेलिकॉप्टर अपघातांची नेत्यांना धडकी

मागील काही दिवसांत पुणे आणि आसपासच्या परिसरात हेलिकॉप्टर दुर्घटना घडण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. कधी तांत्रिक बिघाडामुळे तर कधी दाट धुक्यामुळे... कधी मुसळधार पावसामुळे तर कधी वैमानिकाच्या चुकीमुळे हेलिकॉप्टर ‘क्रॅश’ होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. प्रवासासाठी सोईचे असलेले हेच हेलिकॉप्टर सध्या राजकीय नेत्यांच्या उरात धडकी भरवू लागले आहेत. कधी काय होईल याची शाश्वती नसल्याने जीव मुठीत धरूनच नेत्यांना प्रवास करावा लागत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने नेत्यांना मोठ्या प्रमाणावर सभा घेण्यासाठी फिरावे लागणार आहे. अनेक पक्षांनी विविध कंपन्यांचे हेलिकॉप्टर आरक्षित केले आहेत. मात्र, अशा अपघातांमुळे राजकीय पुढाऱ्यांची चिंता वाढली आहे.

 हेलिकॉप्टरमधून अनेकदा बडे उद्योजक, व्यावसायिक आणि राजकीय नेते, अभिनेते आदी प्रवास करीत असतात. तातडीने एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. हेलिकॉप्टर गावात, शहरात आवश्यकता असेल तिथे उतरवता येते. मात्र, विमान उतरविण्यासाठी धावपट्टीची आवश्यकता असते. त्यामुळे ग्रामीण भागात आणि जिल्ह्याच्या ठिकाणी विमानतळ अथवा धावपट्टी असेलच असे नाही. त्यामुळे हेलिकॉप्टर सोईचे ठरते. आता हीच सोय चिंता वाढविणारी ठरू लागली आहे. अशा अनेक घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. बुधवारी पुण्यात झालेल्या दुर्घटनेमधील हेलिकॉप्टर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांना घेण्यासाठी मुंबईला निघालेले होते. यापूर्वी देखील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत अशा घटना घडल्या आहेत.

 पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात बुधवार, २ ऑक्टोबर रोजी हेरिटेज एव्हिऐशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ऑगस्टा १०९ हे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत कॅप्टन परमजीत सिंग, कॅप्टन गिरीश पिलाई, प्रीतम भारद्वाज यांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टजवळ घडली. हे हेलिकॉप्टर अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांना घेण्यासाठी मुंबईतील जुहूच्या दिशेने निघालेले होते. यासोबतच २४ ऑगस्ट २०२४ रोजी पौड जवळ असलेल्या कोंढवळे गावात एका खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळले होते. मुंबईवरून हैदराबादमधील विजयवाडा असा प्रवास करीत असताना ही दुर्घटना घडली होती. या घटनेत वैमानिक एस. बी. राज, संजय आनंद, अभियंता अमनदीप हरभजनसिंग खोकर, धीर भाटिया जखमी झाले होते.

पुण्यात सर्वाधिक हेलिकॉप्टर

पुण्यात सर्वाधिक हेलिकॉप्टरचा ताफा आहे. पुण्याच्या तुलनेत मुंबईत हेलिकॉप्टरचा ताफा मोठा असला तरी त्याचा वापर ओएनजीसीच्या कामासाठी अधिक होतो. पुण्यात काही खासगी हेलिकॉप्टर आहेत, तर काही कंपन्यांच्या मालकीचे आहेत. एका आकडेवारीनुसार देशात २३१ हेलिकॉप्टर असून त्यात पुण्यात १६ हेलिकॉप्टर आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख घटना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे २ सप्टेंबर २०२४ रोजी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. शिंदे हे परिवारासह भीमाशंकर येथे श्रावणातील शेवटच्या सोमवारी दर्शनासाठी निघालेले होते. मात्र, खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडीत उतरवण्यात आले होते. भीमाशंकर भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि धुके असल्याने हेलिकॉप्टर पुढे जाऊ शकलेले नव्हते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर १० ऑगस्ट २०२३ रोजी देखील भरकटले होते. शिंदे सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना पाऊस आणि धुक्यामुळे हेलिकॉप्टर दरे गावात उतरवणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना घेऊन हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईच्या दिशेने परत फिरले. मुंबईमध्ये हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. त्यानंतर हवामान सुधारल्यानंतर पुन्हा हेलिकॉप्टर साताऱ्याच्या दिशेने गेले. साताऱ्यातील सैनिक स्कूल ग्राउंडवर हे हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. मुख्यमंत्री तेथून पुढे रस्ते मार्गाने दरे गावाकडे रवाना झाले होते.

शिवसेना (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे या ३ मे २०२४ रोजी रायगडमधील महाड येथून बारामतीला हेलिकॉप्टरने जाणार होत्या. मात्र, त्यांचे हेलकॉप्टर हेलिपॅडवर उतरत असतानाच खाली कोसळले. सुदैवाने अंधारे त्यामध्ये बसलेल्या नव्हत्या. या घटनेत वैमानिक सुदैवाने बचावला होता. तांत्रिक बिघाडाच्या कारणामुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याचे कारण देण्यात आले होते. लोकसभा निवडणूक प्रचारासाठी राज्यभरात सुषमा अंधारे फिरत होत्या. त्यांची कोकणात सभा झाल्यानंतर त्या बारामतीकडे जाणार होत्या. त्यांना घेण्यासाठी महाडमध्ये हेलिकॉप्टर आले होते. त्याचवेळी ही घटना घडली होती.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे १७ जुलै २०२४ रोजी गडचिरोली येथील कार्यक्रमासाठी एकत्र निघालेले होते. दोघेही एकाच हेलिकॉप्टरमधून नागपूर ते गडचिरोली असा प्रवास करीत होते. त्यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील होते. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरची दृश्यमानता कमी झाली होती. वैमानिकाने भरकटलेले हेलिकॉप्टर कौशल्याने मार्गावर आणले. तसेच ते सुरक्षितपणे उतरवले.

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १२ जानेवारी २०१८ रोजी हेलिकॉप्टर अपघातातून बचावले होते. फडणवीस भाईंदरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असताना अपघात घडला होता. फडणवीस यांचं हेलिकॉप्टर उतरत असतानाच वैमानिकाला केबलची वायर समोर दिसली. त्यामुळे त्याने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर पुन्हा वर नेले आणि दुसऱ्या जागी उतरवले. वैमानिकाने प्रसंगावधान दाखवले नसते तर मोठा अपघात घडला असता. फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून बचावण्याची ही चौथी घटना होती.

अपघात का होतात?
हेलिकॉप्टर कोसळण्यामागे प्रामुख्याने मानवी चूक, हवामानातील बदल ही कारणे महत्त्वाची ठरतात. एका अहवालानुसार १९९० चे २०१९ या काळात हेलिकॉप्टर अपघातात वैमानिक, चालक दल आणि प्रवाशांसह तब्बल १५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टर खाली उतरताना ७२ अपघात घडले. ईशान्येकडील राज्यात हवामानातील बदल आणि डोंगराळ भाग यामुळे सर्वाधिक अपघात घडतात. सैन्य दलातील १२४ जणांचा लष्करी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. ४० टक्के अपघात हे वैमानिकांच्या चुकीमुळे झाल्याचे दिसते. तर, १९ टक्के अपघात प्रतिकूल हवामानामुळे, ९ टक्के अपघात डोंगराळ प्रदेशातील तारांमध्ये अडकल्याने घडल्याचे आकडेवारी सांगते. व्यावसायिक हेलिकॉप्टरमधील ८५ टक्के अपघाती मृत्यू दिवसा झालेले आहेत. ५४ टक्के समुद्रावर तर ३७ टक्के हेलिकॉप्टर उतरताना झालेत.

किती असते भाडे?

चार्टर्ड विमान          प्रतितास ४.५ लाख ते ५.२५ लाख रुपये

हेलिकॉप्टर              १.५ लाख प्रतितास ते ३.५ लाख रुपये

हेलिकॉप्टर दुर्घटनेचे बळी 

पहिले संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत                           

संजय गांधी                                                                             

काँग्रेस नेते माधवराव शिंदे                                                     

जीएमसी बालयोगी                                                               

उद्योजक तथा मंत्री ओ. पी. जिंदाल                                      

आंध्र प्रदेश मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी                    

 अरुणाचल मुख्यमंत्री दोरजी खांडू   

सर्वाधिक घटना फडणवीस यांच्याबाबत

मुख्यमंत्री फडणवीस १२ मे २०१७ रोजी हेलिकॉप्टरने विदर्भ दौऱ्यावर होते. दरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हे यान आपत्कालीन परिस्थितीत उतरवावे लागले. त्यानंतर फडणवीस नक्षलग्रस्त गडचिरोलीहून नागपूरला वाहनाने रवाना झाले. यासोबतच, २५ मे २०१७ रोजी फडणवीस मराठवाडा दौरा संपवून लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील हेलिपॅडवर आले. हेलिकॉप्टरने लातूरसाठी उड्डाण करीत असतानाच अचानक सोसाट्याचा वारा सुटला. त्यामुळे वैमानिकाने हेलिकॉप्टर जमिनीच्या दिशेने वळवले. ही कसरत करीत असतानाच हेलिकॉप्टरला विजेच्या तारांचा स्पर्श झाला. त्यामुळे हेलिकॉप्टर जमिनीवर पडले. सुदैवाने फडणवीस आणि वैमानिक यातून बचावले. यासोबतच जुलै २०१७ मध्ये अलिबाग येथील एका कार्यक्रमासाठी फडणवीस आलेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते मुंबईला परत निघालेले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस हेलिकॉफ्टरमध्ये बसत असतानाच उड्डाण झाले. सुरक्षारक्षकांच्या हे लक्षात येताच फडणवीसांना हेलिकॉप्टरपासून तातडीने दूर करण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. तसेच, ९ डिसेंबर २०१७ रोजी फडणवीस विविध कार्यक्रमांसाठी नियोजित दौरा असल्याने मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला निघाले होते. मात्र, ते प्रवास करीत असलेले हे हेलिकॉप्टर ओव्हरलोड झालेले होते. त्यामुळे नाशिकमध्ये आपत्कालीन परिस्थितीत हेलिकॉप्टर उतरविण्यात आले. ऑक्टोबर २०१९ मध्ये देखील फडणवीस यांच्यासोबत असाच प्रसंग घडला होता. त्यांची रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये प्रचार सभा होती. पेण-बोरगाव येथील हेलिपॅडवरील मातीमध्ये त्यांचे हेलिकॉप्टर रुतून बसले होते. त्यामुळे वैमानिकाचे नियंत्रण सुटले. त्याने प्रसंगावधान राखत काही क्षणातच नियंत्रण मिळवत उड्डाण केले होते.                                     

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest