संग्रहित छायाचित्र
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रास्ता पेठेत कारवाई करीत तब्बल १० लाख ८४ हजारांचा गुटखा जप्त केला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून हे दोघे बंदी घातलेल्या गुटख्याचा साठा करून छुप्या पद्धतीने विक्री करीत असल्याचे समोर आले आहे.
मुदसर इलियास बागवान (वय ४०, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) आणि अन्वर शरफुद्दिन शेख (वय ३८, रा. कोंढवा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात सिगारेट, अन्य तंबाखूजन्य पदार्थ उत्पादने, अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य शासनाने गुटखा वाहतूक, विक्रीवर बंदी घातली आहे. छुप्या पद्धतीने गुटखा विक्री, तसेच वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा सपाटा पोलिसांनी लावला आहे. पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक आणि पथक रास्ता पेठेत गस्त घालत होते.रास्ता पेठेतील एका सोसायटीत दोघांनी गुटखा, पानमसाल्याचा साठा करून ठेवल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १० लाख ८४ हजार ७१६ रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.