गड आला पण गरड गेला...
विजय चव्हाण
काही दिवसांपूर्वीच माऊंट एव्हरेस्ट सर केलेले पोलीस कर्मचारी स्वप्निल गरुड यांचा उपचारा दरम्यान निधन झाले आहे.
स्वप्नील गरड यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर त्यांचे ‘ब्रेन डेड’ झाले होते. त्यांच्यावर काठमांडू येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र बुधवारी (दि. ७) दुपारी पावणेचारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
एव्हरेस्टच्या मोहिमेदरम्यान पुणे पोलीस दलातील कर्मचारी स्वप्नील गरड ब्रेन डेड झाले होते. गरड यांना उपचारासाठी काठमांडू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गरड हे पुणे पोलीस विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी ते एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी गेले होते. शिखर सर केल्यावर मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना उपचारासाठी काठमांडू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा ब्रेन डेड
झाल्याची माहिती पुणे पोलीस विभागातील त्यांच्या मित्रांनी दिली.
स्वप्नील गरड हे उत्तम गिर्यारोहक होते. याआधी त्यांनी जगातील अनेक शिखरे सर केली. गेल्या वर्षी स्वप्नील गरड यांनी जगातील सर्वात सुंदर आणि तांत्रिकदृष्ट्या अवघड असे नेपाळचे माऊंट अमा दबलम शिखर सर केले होते. पिंपरी-चिंचवड माऊंटेनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष आणि अनुभवी गिर्यारोहक सुरेंद्र शेळके, विनोद कमभोज यांचे त्याना मार्गदर्शन मिळाले होते. माऊंट अमा दबलम हे ६,८१२ मीटर उंचीचे शिखर तांत्रिकदृष्ट्या अतिशय अवघड आहे. हे शिखर सर केल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी तिरंगा ध्वज फडकवला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथे नेऊन नमन केले.
गरड यांच्या मृत्यूमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. ३१ मे रोजी पुणे पोलीस दलात कार्यरत असलेले प्रकाश अनंत यादव यांचादेखील मृत्यू झाला होता. त्यामुळे एक पाठोपाठ दुसरा पोलिसाचा मृत्यू झाल्यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. गरड हे तीन वर्षांपासून कार्यालयात ये-जा करण्यासाठी सायकलचा वापर करत. याद्वारे ते आरोग्य आणि इंधनबचतीचा संदेश देत असत. रोज १५ किलोमीटर सायकल प्रवास ते करत असत.
'हनुमान टिब्बा' सर करणारे गरड पहिलेच पोलीस
गरड यांना गिर्यारोहणाची आवड २०१६ मध्ये लागली. त्यांनी गिर्यारोहणाचं शास्त्रोक्त शिक्षण घेण्यासाठी 'बेसिक' आणि 'अडव्हान्स' कोर्स केले. सह्याद्री पर्वतरांगांमधील सुळक्यांपासून ते हिमाचल प्रदेशमधील मनालीजवळ असलेले ५,९०० मीटर उंचीचे ‘हनुमान टिब्बा’ शिखर त्यांनी सर केले. हे शिखर सर करणारे गरड महाराष्ट्र पोलीस दलातील पहिले पोलीस ठरले. यासोबतच त्यांनी दुर्गप्रेमी या गिरिभ्रमण करणाऱ्या संस्थेतील काही सदस्यांसोबत ६,१११ मीटर उंचीचे ‘माऊंट युनान’हे शिखर सर करून तेथे १५ बाय २१ फूट उंचीचा राष्ट्रध्वज फडकवला होता.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.