फ्लेक्स फाटून दुचाकीवर आदळले, दाम्पत्य जखमी
विजय चव्हाण
होर्डिंगमुळे होणाऱ्या अपघातांचे सत्र सुरूच आहे. वाघोलीत होर्डिंगवरील फ्लेक्स फाटून दुचाकीधारक दाम्पत्य जखमी झाले, तर लोणीकंद येथे होर्डिंगचा लोखंडी रॉड तुटून कारचे मोठे नुकसान झाले आहे. पाच दिवसांपूर्वी वाघोलीत एच. पी. पेट्रोल पंपासमोर वादळामुळे दुचाकीवर जाणाऱ्या दाम्पत्याच्या अंगावर होर्डिंगचा फ्लेक्स आल्याने ते पडून जखमी झाले, तर रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास सणसवाडी येथील बापू तुकाराम हरगुडे हे कारमधून जात असताना लोणीकंद येथे वादळामुळे त्यांच्या कारवर होर्डिंगचा रॉड तुटून पडल्याने कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणी जखमी झाले नाही. त्यांनी याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हे फ्लेक्स कुठेही लटकत असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात सर्वत्र होर्डिंग तुटल्याच्या घटना घडतात. यामुळे अनधिकृत होर्डिंगवर लवकर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. ज्या होर्डिंगला परवाना आहे त्यांची सुरक्षितताविषयक पाहणी करावी आणि ते सुरक्षित नसल्यास काढून टाकावे,असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
माझ्यासमोर होर्डिंगवरील फ्लेक्स फाटून दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाल्याची घटना घडली. यामुळे परवाना नसलेल्या होर्डिंगवर त्वरित कारवाई होणे गरजेचे असल्याची भावना स्थानिक कार्यकर्ते गणेश सातव यांनी व्यक्त केली आहे. नगर रस्ता परिसरातील होर्डिंग तपासणीचे काम सुरू असून अनधिकृत होर्डिंगवर निश्चित कारवाई होणार आहे. पुणे-नगर महामार्गालगत अनेक होर्डिंग आहेत. परवाना नसलेले अनेक होर्डिंग महापालिकेने कारवाई करून पाडले आहेत. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी होर्डिंग असल्याचे नगररोड, वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त सोमनाथ बनकर यांनी कबूल केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.