डमी उमेदवार
बी. आर. ओ. पदाच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार बसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पुण्यातील धानोरी येथील भैरवनगर येथे असलेल्या ग्रीफ, बॉर्डर रोड ऑरगनायझेशन, मनिस्ट्री ऑफ डिफेन्स, बी. आर. ओ. स्कुल अॅन्ड सेंटरमध्ये मंगळवारी (दि. २३) घडला. या प्रकरणी चार जणांना विश्रांतवाडी पोलीसांनी अटक केली आहे.
रामपती विशंबर दयाल (वय २४, रा. गाव पक्कापुर, पोस्ट स्वारा, ता. फातीयासबाद, जि. आग्रा, राज्य उत्तर प्रदेश), परमजित विजयपाल सिंग (वय ३२, रा. गाव बिजली, पोस्ट खेरगड, ता. सिकोदाबाद, जि. फिरोजा बाद, राज्य उत्तर प्रदेश), सोनू सुरेश (वय २१, रा. गाव पोस्ट कुचराना, ता. अलेवा, जि. जिंद, राज्य हरियाणा) आणि आणखी एक जण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी बी. आर. ओ. स्कुल अॅन्ड सेंटरचे असीस्टंट अॅडम ऑफिसर अरून कुमार (वय ४६) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी बी. आर. ओ. स्कुल अॅन्ड सेंटरमध्ये बी. आर. ओ. पदासाठी लेखी परीक्षा पार पडली. ही परीक्षा सकाळी ८ ते १२ या वेळेत आयोजित करण्यात आली होती. यावेळी आरोपी रामपतीने आपल्या जागी परमजित याला तर सोनूने आपल्या जागी दुसऱ्या एका जणाला परीक्षेसाठी बसवले होते. हा प्रकार लक्षात येताच असीस्टंट अॅडम ऑफिसर अरून कुमार यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीसांनी चार जणांना अटक करून त्यांच्यावर कलम ४१९, ४२० आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.