'ऑक्टोबर हिट'च्या झळा, पुण्यातील तापमान ३४.६ अंश सेल्सिअसवर
पुढील दहा दिवस राज्याला ऑक्टोबर हीटच्या झळा बसणार आहे. त्यानंतर तापमानात हळूहळू घट होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केला. सध्या पुण्यातील किमान तापमान ३४.६ अंश सेल्सिअस आहे. तर किमान तापमान १९.५ अंश सेल्सिअस आहे. मात्र, येत्या रविवारी म्हणजेच १५ ऑक्टोबरपर्यंत पुणे आणि परिसरात कमाल तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पाऊस नसल्यामुळे नागरिकांना पुढील आठवड्यात उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील चार-पाच वर्षांच्या तुलनेत यंदा १४ दिवस अगोदर मोसमी वारे राज्यातून माघारी गेले आहे. त्यामुळे हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाले आहे. सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडत आहेत. सध्या सूर्य विषुववृत्तावर असल्यामुळे भारतीय उपखंडाला जास्त उष्णता मिळत आहे, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे. देशातील वातावरणावर ऑगस्टपासून एल-निनोचा प्रभाव दिसून येत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून ऑक्टोबर हीटच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. पुढील दहा दिवस अशीच स्थिती राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, राज्याच्या बहुतांश भागांतून मान्सूनने माघार घेतल्याने कोरडे हवामान आहे. उन्हाचा तडाखा तीव्र स्वरुपाचा जाणवणार आहे. पावसाची शक्यता नाही. ही उष्णतेची लाट पुण्यापूरती मर्यादित नाही तर राज्यात उष्णतेच्या झळा जाणवणार आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे ३७.१ अंश सेल्सिअस तर अकोल्यात ३७.२ अंश सेल्सिअस नोंद झाली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.