भाऊसाहेब शिंदे
“२०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमरा-कळवा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी अभिनेत्री दिपाली सय्यद उद्धव ठाकरे यांना भेटल्या होत्या. मात्र मुंब्रा-कळवा मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिपाली सय्यद यांच्याकडे ४ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे दिपाली सय्यदने अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमशी संपर्क साधला आणि त्यानंतर दाऊदने उद्धव ठाकरे यांना फोन केला”, असा खळबळजनक दावा दिपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.
भाऊसाहेब शिंदे यांनी या अगोदर देखील दिपाली सय्यद यांच्यावर गंभीर आरोप केले होता. या प्रकरणी दिपाली सय्यद यांनी मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात भाऊसाहेब शिंदे यांच्या विरोधात बदमानी केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना भाऊसाहेब शिंदेंनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. भाऊसाहेब शिंदे म्हणाले की, “दिपाली सय्यद यांनी २०१८ मध्ये दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेत प्रवेश केला होता. त्यानंतर श्रीगोंदा येथून उमेदवारी मागितली. मात्र, मेटेंनी उमेदवारी नाकारल्यामुळे दिपाली सय्यद यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणूकीसाठी उद्धव ठाकरेंना उमरा-कळवा मतदारसंघातून उमेदवारी मागितली.”
“मात्र, उमेदवारी देण्य़ासाठी उद्धव ठाकरे यांनी दिपाली सय्यद यांच्याकडे ४ कोटी रुपयांची मागणी केली होती. यासाठी दिपाली सय्यद यांनी ३ ऑक्टोंबर २०१९ रोजी रश्मी ठाकरे यांना ६५ लाख रुपये आरटीजीएसच्या माध्यमातून पाठवले. मात्र, सर्व पैसे आधी द्या अशी मागणी उद्धव ठाकरे करत होते. ४ ऑक्टोंबरला उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे दिपाली सय्यद रडत होत्या. दिपाली सय्यद यांनी दाऊदची पत्नी मेहजाबीन शेख हिला फोन केला. त्यानंतर दाऊद आणि दिपाली सय्यद यांचे बोलणे झाले. त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. दिपाली सय्यद यांनी उद्धव ठाकरे यांचा फोन नंबर मेहजाबीन यांच्या माध्यमातून दाऊद यांना पाठवला. त्यानंतर दाऊदचा उद्धव ठाकरेंना फोन आला होता”, असा दावा भाऊसाहेब शिंदे यांना केला आहे.