ओशो आश्रमात वादाची माळ: संन्यासमाळ घालून आश्रमात प्रवेश करण्यास मनाई, ओशोंच्या एका शिष्येची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार

ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन (ओआयएफ) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ओशो यांची संन्यासमाळ परिधान करून आश्रमात प्रवेश करण्यास मनाई करण्याच्या निर्णयाविरुद्ध ओशोंच्या एका शिष्येने मुंबई धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

संग्रहित छायाचित्र

ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन (ओआयएफ) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ओशो यांची संन्यासमाळ परिधान करून आश्रमात प्रवेश करण्यास मनाई करण्याच्या निर्णयाविरुद्ध ओशोंच्या एका शिष्येने मुंबई धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. (Osho International Foundation)

कुनिका आरती राझदान उर्फ आरती राझदान यांनी मुंबईतील धर्मादाय आयुक्त कार्यालयात ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनचे अध्यक्ष देवेंद्रसिंग देवल, कोषाध्यक्ष मुकेश कांतीलाल सारडा उर्फ एस. डब्ल्यू. मुकेश भारती, सदस्य लालप्रताप सिंह उर्फ योग प्रताप आणि सचिव माँ अमृत साधना यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

ओशो आपल्या प्रत्येक शिष्याला एक लाकडी जपमाळ देत असत. त्यामध्ये एक लॉकेट असायचे. त्याच्या दोन्ही बाजूला ओशोंचे चित्र जोडलेले असायचे. प्रत्येक शिष्याने ते लॉकेट नेहमी परिधान करणे अपेक्षित होते.  मात्र, आता हिच जपमाळ परिधान करून आश्रमात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे आरती राझदान यांनी महाराष्ट्र सार्वजनिक न्यास कायदा कलम ४१ अ, कलम २९५ अ अंतर्गत  तक्रार केली आहे.  

यासंदर्भात ‘सीविक मिरर’सोबत बोलताना राझदान म्हणाल्या,  ‘‘आश्रमात आमच्या संन्यास दीक्षेदरम्यान आम्हाला दिलेली जपमाळ घालू देत नाहीत. आमच्या धार्मिक आणि आध्यात्मिक श्रद्धेसाठी ही माळ अतिशय पवित्र आहे.  २५ नोव्हेंबर २०२२ रोजी जेव्हा मला ओशो आश्रमात ध्यानासाठी जायचे होते.

त्यावेळी ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या अध्यक्षांनी मला माळ परिधान करून जाण्यास मनाई केली. याबाबत मी पोलिसांत तक्रारही नोंदवली. हे रोजच घडत आहे. आमचा अपमान होत आहे, धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. आम्ही दिलेल्या व्हीडीओ क्लिपमध्ये संन्यासींना त्यांची संन्यासी माळ काढून टाकण्यास किंवा लपवण्यास सांगताना पुरावा म्हणून तो स्पष्टपणे दिसत आहे.’’

ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या चुकीच्या नियमांच्या विरोधात आम्हाला तक्रार करायची आहे, असे सांगून राझदान म्हणाल्या, ‘‘आमच्या दृष्टीने ही माळ खूप पवित्र असून सद‌्गुरूला शरण जाण्याचे प्रतीक आहे. जन्म, विवाह, संन्यास आणि मृत्यू हे प्रत्येकाच्या आयुष्यातील टप्पे आहेत, असे पुराणात आणि इतर ग्रंथांमध्ये लिहिले आहे. संन्यास हा आपल्या जीवनाला कलाटणी देतो. त्या संन्यासाचे प्रतीक ही माळ आहे.  हिंदू स्त्रीसाठी मंगळसूत्राचे जे महत्त्व आहे तेच आमच्यासाठी माळेचे आहे. तरीही ओशो आश्रमाच्या विश्वस्तांनी हे नियम तयार करून आम्हाला माळ परिधान करून प्रवेश करण्यास मनाई केली आहे.  २००० पर्यंत याला परवानगी होती.’’

धर्मादाय आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत राझदान यांनी म्हटले आहे की, आमचे मूलभूत आणि धार्मिक अधिकार परत मिळावे, अशी आमची मागणी आहे. याच कारणास्तव दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून आलेल्या एक हजार संन्यासींच्या प्रवेशावर बंदी घातली. यंदा २१ मार्च रोजी त्यांनी माळ परिधान करण्यास परवानगी असल्याचे सांगितले. २२ मार्च रोजी जेव्हा भक्त माळ परिधान करून आश्रमात येत होते तेव्हा त्यांनी सांगितले की परवानगी नाही. या नियमाचे पालन न करणाऱ्या संन्याशांवर लाठीमारही करण्यात आला.

यासंदर्भात ‘सीविक मिरर’ने ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या सचिव माँ अमृत साधना यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे प्रकरण जुने असल्याचे सांगितले. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ओशो आश्रमाच्या ट्रस्टने काही नियम लागू केल्याची माहिती त्यांनी दिली.


ओशोंनी स्वत: भक्तांना माळ घालायची की नाही, याचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र, माळ परिधान केल्यास माझ्या संन्यासींना बंदी घाला, असे कुठेही म्हटलेले नाही. आश्रमाच्या विश्वस्तांनी त्यांच्या फायद्यासाठी ओशोंच्या शब्दांचा दुरूपयोग केला आहे. या माळेमुळे सुरक्षेचा कोणताही धोका नाही. तरी विश्वस्तांनी त्यावर बंदी घालण्यासारखे विचित्र नियम का बनवले?
- आरती राझदान, ओशोंच्या शिष्या

हे प्रकरण जुने आहे. उच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्णय दिला आहे. त्यानुसार ट्रस्टने काही नियम लागूदेखील केले आहेत. त्याचे पालन व्हायला हवे. याबद्दल आणखी काही विषय असतील तर ते बघायला हवे.
- माँ अमृत साधना, सचिव, ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest