मद्यधुंद वडीलांची लेकानेच केली हत्या, मुलाला अटक
एका २७ वर्षीय तरुणाने मद्यधूंद वडिलांना काठीने मारहाण करून गळा आवळत हत्या केली धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील मांजरी बुद्रुक परिसरात घुले पाटील कॉलनीमध्ये मंगळवारी (दि. ९) दुपारी १२ च्या सुमारास घडली. या प्रकरणी हडपसर पोलीसांनी मुलाला अटक केली आहे.
रवी क्षीरसागर (वय ५२) असे मृत्यू झालेल्या वडीलाचे नाव आहे. तर ओंकार रवी क्षीरसागर (वय २७, रा. मांजरी) या पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मृत रवी यांची पत्नी रेखा रवी क्षीरसागर (वय ४३) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध पतीची हत्या केल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत वडील हे दारूच्या नशेत होते. दारुच्या नशेत ते मुलाला शिवीगाळ करत होता. यावेळी त्यांनी मुलाला चप्पलही फेकून मारली. यामुळे मुलगा आणि वडीलांमध्ये वाद झाला. वादादरम्यान ओंकारने वडिलांना काठीने मारहाण केली. त्यानंतर वडीलांचा गळा दाबून खून केला. घडलेल्या घटनेनंतर पत्नी रवी यांना रुग्णालयात दाखल केले होत. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. सध्या हडपसर पोलीस अधिक तपास करत आहेत.