Bhushi Dam in Kothrud : कशाला लोणावळा? कोथरूडला अवतरला 'भुशी डॅम'

शहरात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी तुंबले. कर्वेनगर येथील स्मशानभूमीत पाणी घुसले, तर डहाणूकर कॉलनी येथील पादचारी मार्गामध्ये पाणी शिरल्याने भुयारी मार्ग बुडाला होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Mon, 25 Sep 2023
  • 12:57 pm
Bhushi Dam in Kothrud

डहाणूकर कॉलनीत पाणी शिरल्याने भुयारी मार्ग बुडाला, अनेकांनी पुण्यात 'भुशी डॅम' अवतरल्याची बाब सोशल मीडियावर केली शेअर

शहरात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी तुंबले. कर्वेनगर येथील स्मशानभूमीत पाणी घुसले, तर डहाणूकर कॉलनी येथील पादचारी मार्गामध्ये पाणी शिरल्याने भुयारी मार्ग बुडाला होता. मात्र पायऱ्यांवरून वेगाने खाली जाणारे पाणी पाहून अनेकांनी पुण्यात 'भुशी डॅम' अवतरल्याची बाब सोशल मीडियावर शेअर केली.  शहरात कर्वेनगर, वारजे, सिंहगड रस्ता, धनकवडी, बिबवेवाडी, आंबेगाव, कात्रज, नगर रस्ता, वडगाव शेरी या परिसराला शनिवारी दुपारी झालेल्या पावसाने झोडपले. महापालिकेने पावसाळी गटारांच्या चेंबरच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने जाळ्यांवर मोठ्या प्रमाणात यापूर्वीच कचरा अडकलेला होता. हा कचरा न काढल्याने जोरदार पावसाला सुरुवात होताच वाहणारे पाणी पावसाळी गटारात न जाता चेंबरवरूनच वाहू लागले. त्याचा फटका वाहनचालकांना बसला.

रस्त्यावरून एक ते दोन फूट पाणी वाहात असल्याने गाडी चालवताना तारांबळ उडत होती आणि काही गाड्यांमध्ये पाणी गेल्याने त्या बंद पडल्या. कर्वेनगर येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली, या परिसरातील पाणी काढण्याचे काम वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाकडून सुरू करण्यात आले.

कर्वे रस्ता येथे डहाणूकर कॉलनी चौकातील भुयारी मार्गात पावसाचे पाणी शिरले त्यामुळे संपूर्ण भुयारी मार्ग पाहण्याखाली गेला. या निमित्ताने महापालिकेच्या ढसाळ कारभाराचा नमुना सर्वांपुढे आला. पादचारी भुयारी मार्ग रस्त्याला समांतर असल्याने हे पाणी थेट आतमध्ये आले यापूर्वीही अनेकदा या भुयारी मार्गात पाणी शिरले होते तरी देखील महापालिका प्रशासनाने यात सुधारणा केलेली नाही.

सिंहगड रस्त्यावर सलग दुसऱ्या दिवशी धायरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पु. ल. देशपांडे उद्यानासमोरील महावितरण कार्यालय, इनामदार चौक, हिंगणे चौक तसेच, संतोष हाॅल येथे पाणी साचले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

"हवामान विभागाने मोठ्या पावसाची शक्यता वर्तवल्यानंतर महापालिकेने सर्व ठिकाणी मदत कार्यासाठी पथके तैनात केली आहेत. आज पाणी तुंबल्यानंतर पाण्याचा निचरा करण्यासाठी कर्मचारी कामास लागले आहेत. असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest