‘सीविक मिरर’चा दणका; बेशिस्त पीएमपीचालकांना अखेर चाप
लक्ष्मण मोरे
पीएमपीच्या बेशिस्त (PMPML) आणि बेदरकार चालकांना चाप लागणार असून यापुढे वाहतूक नियमांचे उल्लंघन (traffic rules) केल्यास तसेच विशेषत: मोबाईल फोनवर बोलताना चालक आढळून आल्यास (Latest News) प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड संबंधित चालकाला केला जाणार आहे.
पीएमपी आणि एसटी बसचालकांकडून होणाऱ्या वाहतूक नियमभंगाबाबत 'सीविक मिरर'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. वाहतूक पोलिसांनीदेखील विशेष मोहीम राबवित कारवाईला सुरुवात केली होती. ‘सीविक मिरर’च्या वृत्ताची दखल घेत पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्रप्रताप सिंग यांनी बेशिस्त बस चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या संदर्भात कारवाई करण्याचे लेखी आदेश त्यांनी शुक्रवारी (दि. २०) दिले.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील तसेच खासगी ठेकेदारांच्या बसवरील चालक सेवक वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, बस चालविताना मोबाईल फोनचा वापर करणे, बसेस बसस्टॉपजवळ किंवा बसस्टॉपला लागून बस व्यवस्थित उभी न करणे, बस रेड सिग्नल असताना पुढे घेऊन जाणे, बस सिग्नलला योग्य पद्धतीने उभ्या न करणे, झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे बस उभ्या करणे तसेच बससंचलन करतेवेळी बसचे डाव्या बाजूने संचलन होत नसल्याचे 'सीविक मिरर'ने समोर आणले होते. या बातम्यांची गंभीर दखल पीएमपीएमएलचे अध्यक्ष सचिन्द्रप्रताप सिंग यांनी घेतली असून बेशिस्त चालकांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
सिंग यांच्या निर्देशानुसार सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी कार्यालयीन आदेश काढले आहेत. ‘‘वाहतुकीचे नियम पाळण्याच्या अनुषंगाने सर्व चालक सेवकांना यापूर्वी वेळोवेळी कार्यालय परिपत्रकाद्वारे सूचना देऊनसुद्धा वर्तमानपत्रामध्ये बातम्या प्रसिद्ध होणे, पोलीस प्रशासनाकडून याबाबत पत्राद्वारे कळविणे तथा प्रवासी नागरिकांकडूनदेखील तक्रारी प्राप्त होत असल्याचे निदर्शनास आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व चालक आणि वाहक कर्मचाऱ्यांना सूचित करण्यात येते की, बससंचलन करताना मोबाईल फोनचा वापर करू नये. तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यास, वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई झाल्यानंतरसुद्धा महामंडळाकडे तक्रार प्राप्त झाल्यास चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे,’’ असे या आदेशात नमूद केले आहे. चालक मार्गावर बससंचलन करीत असताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करतात की नाही? मोबाईल फोनचा वापर करीत आहेत काय? याची तपासणी करण्यासाठी तपासणी पथके नेमण्यात आली आहेत. या पाहणीमध्ये अथवा प्रवासी नागरिकांना वाहतूक नियमभंग करताना अथवा मोबाईलवर बोलताना चालक आढळून आल्यास महामंडळाकडील चालकांना एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
तसेच भाडेतत्त्वावरील (खासगी बस) चालकास करारातील अटी-शर्तीनुसार दंडाची आकारणी करण्यात येणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे. मनमानी पद्धतीने बस चालवत वाहतूक नियमभंग करणाऱ्या पीएमपी आणि एसटी बस चालकांना वाहतूक पोलिसांनी झटका देत २ सप्टेंबर ते ११ सप्टेंबरदरम्यान विशेष मोहीम राबविली. तब्बल ३६४ बसवर कारवाई करीत १८ लाख २०० रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. यामध्ये रहदारीला अडथळा निर्माण करणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करणे, अनधिकृत थांबा, सिग्नल तोडणे आदी स्वरूपाच्या कारवायांचा समावेश होता.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.