बांधकामांना पिण्याचे पाणी वापरण्यास बंदी, पुणे महापालिकेचा निर्णय

पुणे महापालिकेने शहरामध्ये सुरु असलेल्या सर्व बांधकामांना प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता बांधकामांना पिण्याचे पाणी वापरता येणार नाही. तसेच शहरात सुरू असलेल्या बांधकामांची संबंधित मालकांनी जागानिहाय महापालिकेच्या अ‍ॅपवर नोंदणी करावी, असे आवाहनही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 22 Jun 2023
  • 01:12 pm
बांधकामांना पिण्याचे पाणी वापरण्यास बंदी, पुणे महापालिकेचा निर्णय

बांधकामांना पिण्याचे पाणी वापरण्यास बंदी, पुणे महापालिकेचा निर्णय

प्रक्रिया केलेले सांडपाणी वारण्याचे महापालिकेचे आवाहन

पुणे महापालिकेने शहरामध्ये सुरु असलेल्या सर्व बांधकामांना प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता बांधकामांना पिण्याचे पाणी वापरता येणार नाही. तसेच शहरात सुरू असलेल्या बांधकामांची संबंधित मालकांनी जागानिहाय महापालिकेच्या अ‍ॅपवर नोंदणी करावी, असे आवाहनही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

यंदा मान्सून लांबणीवर पडला आहे. त्यातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे दर गुरूवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय या अगोदर महापालिकेने घेतला आहे. मात्र, आता शहरातील विकासकामांची मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे, पिण्याचे पाणी न वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत प्रसिद्धी पत्रक काढत महापालिकेने म्हटले आहे की, एटीपीमधील (सांडपाणी प्रक्रिया यंत्र) प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यासाठी पुणे महापालिकेने "pmc stp water tanker” हे अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे.

शहरामध्ये ज्या विकसकांची बांधकामे चालू आहेत त्यांनी बांधकामाची जागानिहाय या अ‍ॅपमध्ये नोंदणी करावी. त्याचबरोबर प्रक्रिया केलेले सांडपाणी बांधकाम स्थळापर्यंत टँकरव्दारे पोहोचवण्यास इच्छुक असतील त्यांनी देखील टँकरनिहाय नोंदणी करण्याची सुविधा अ‍ॅपमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या अ‍ॅपमध्ये नोंदणी केलेल्या टँकरची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या खासगी टँकर मालकांनी देखील विनाशुल्क टँकरची नोंदणी ॲपवर करावी. तसेच पिण्याचे पाणी बांधकामांना न वापरता केवळ प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरण्यात यावे, या उद्देशाने महापालिकेने घेतलेल्या निर्णयाला खाजगी टँकर मालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest