माऊली आणि जगद्गुरूंच्या पालख्यांचे पुण्यात आगमन
विजय चव्हाण
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे सोमवारी (दि. १२) पुणे शहरात आगमन झाले. यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिभावाने आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ च्या जयघोषाने रंगले होते.
देहू येथून निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीने रविवारी रात्री आकुर्डी येथे तळ ठोकला. सोमवारी सकाळी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिर येथून पालखीचे प्रस्थान झाले आणि चिंचवड, पिंपरी, वल्लभनगर, अभियांत्रिकी महाविद्यालय चौकातून पालखी मार्गस्थ झाली.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सकाळी आळंदी येथून प्रस्थान झाले आणि वडमुखवाडी, चर्होली फाटा, दिघी मॅगझिन चौक, अभियांत्रिकी महाविद्यालय चौकातून मार्गक्रमण केले. सायंकाळी सहाच्या सुमारास वाकडेवाडी येथे दोन्ही पालख्या पुणे महापालिकेच्या हद्दीत दाखल झाल्या. महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी त्यांचे स्वागत केले.
संचेती रुग्णालयाजवळील रेल्वे उड्डाणपूल ओलांडून दोन्ही पालखी कृषी महाविद्यालयाच्या दिशेने आणि तेथून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या रस्त्याने निघाल्या. त्यानंतर पालखी छत्रपती संभाजी महाराज पूल, अलका चौक, लक्ष्मी रस्तामार्गे पुण्यातील मध्यवर्ती भागाकडे निघाली. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा चौकात पोहोचली असून बुधवारी (दि. १४) पहाटेपर्यंत पालखी तळ ठोकून राहणार आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात पोहोचली असून तीदेखील बुधवारी पहाटेपर्यंत तळ ठोकणार आहे.
पालखीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण मिरवणूक मार्गावर भाविकांनी गर्दी केली होती. पालखी मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मार्गावरील प्रत्येक प्रमुख चौकात भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.
पर्यावरण दिंडी, जलदिंडी, आयटी दिंडी, शिक्षक दिंडी, उद्योजक दिंडी अशा वेगवेगळ्या दिंड्या उत्साहाने सहभागी होतात. यातील सहभाग घेणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. यात वेगवेगळ्या विद्यापीठाचे विद्यार्थीही येतात. कोणी आरोग्याचा जनजागर करत असतो, तर कोणी प्लास्टिकचे पर्यावरणावरील दुष्परिणाम सांगत असतात. विठ्ठलाचे दर्शन घेण्याच्या ओढीने पंढरीला निघालेल्या या वैष्णवांच्या मेळ्याला सहभागी होता आले, हीच मोठी भक्ती असल्याची भावना यावेळी असते.
- प्रभाकर देशपांडे, वारीचे अभ्यासक
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.