अटक
नोकर भरतीसाठी १० वी आणि १२ वीच्या बनावट प्रमाणपत्रासाठी बनावट सेंटरची माहिती दिल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. बनावट सेंटरची माहिती देणाऱ्याला पोलीसांनी अटक केली आहे. या आरोपीला स्वारगेट पोलीसांनी मुंबईतील कुर्ला वेस्ट येथून अटक केली आहे.
संदीपकुमार शमलाशंकर गुप्ता (वय ३३, रा. साईकृपा चाळ हनुमानगनर खाडी, नं. ०३, कुर्ला वेस्ट, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बनावट प्रमाणपत्र प्रकरणात या अगोदर आरोपी सय्यद इमाम सय्यद इब्राहीम याला पोलीसांनी अटक केली आहे. संदीपकुमार हा देखील बनावट सेंटरची माहिती पुरवत होता.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोकर भरतीसाठी सय्यद इमाम सय्यद इब्राहीम हा १० वी आणि १२ वीच्या बनावट प्रमाणपत्राचे सेंटर चालवत होता. सय्यदने ८ फ्रेब्रवारी ते ३० एप्रिल २०२३ दरम्यान स्वारगेट येथील जेधे चौकातून संदीप ज्ञानदेव कांबळे नावाच्या व्यक्तीकडून ६० हजार रुपये घेऊन वेगवेगळ्या खात्यातील नोकर भरतीसाठी बनावट प्रमाणपत्र दिले होते. या प्रकरणी सय्यदला अटक करून त्याच्यावर कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४७१, १९७, १९८, ४८२, ४८४, ३४ सह माहिती व तंत्रज्ञान अधिनियम अमेंडमेंट अॅक्ट २०१० चे कलम ६५, ६६ (अ), (क), (ई) नुसार गुन्हा दाखल केला होता.
मात्र, या प्रकरणात आरोपी संदीप हा बनावट प्रमाणपत्रासाठी बनावट सेंटरची माहिती पुरवत होता. याप्रकरणी स्वारगेट पोलीस संदीपचा शोध घेत असताना तो मुंबईत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस कुर्ला वेस्ट येथील हनुमाननगर खाडी येथील साईकृपा चाळमध्ये पोहोचले. पोलीस येताच आरोपी संदीपने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीसानी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.