“अजब चोर की गजब कहानी”, पठ्ठ्या चक्क चोरत होता चपला
पुण्यातील खडकी परिसरात एका चोरट्याने तब्बल ४० हजार रुपयांच्या चपला चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या तपास करत असताना पोलीसांनी ३ आरोपींना अटक केली आहे. यासाठी पोलीसांनी तब्बल २० ते ३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार घेतला होता.
सागर दत्ता चांदणे (वय २३ वर्षे), आकाश विक्रम कपुर (वय २२ वर्षे), जाफर शेख (वय २१ वर्षे), असे अटक करण्यात आली आहे. हरेश श्रीचंद अहुजा (वय ३८, धंदा व्यवसाय) यांनी याबाबतची तक्रार खडकी पोलीस ठाण्यात दिली होती. खडकी पोलीसांत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी २० ते ३० सीसीटीव्हीच्या माध्यमातून या आरोपींचा तपास सुरू केला. या माध्यमातून आरोपी निष्पन्न झाले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहुजा यांचे या खडकी परिसरात चपलांचे गोडाऊन आहे. शनिवारी रात्री गोडाऊन बंद असताना गोडाऊनचे शटर उचकटून या चोरट्यांने हाताला येतील, तसे चपलांचे जोड बाहेर काढले. तब्बल ३० ते ४० हजार किंमतीच्या ५५ चपलांच्या जोड्या आरोपींनी लंपास केल्या होत्या. यापैकी ४० पुरुषांच्या तर १५ जोड्या महिलांच्या चपलांच्या होत्या. हे आरोपी अशिक्षित असून यांना दारू पिण्यासाठी पैसे लागत असल्याने यांनी ही चोरी केली होती. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीसांनी यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.