संग्रहित छायाचित्र
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र राज्य मंडळाकडून २२ जानेवारी रोजी ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार असून, शाळा - कनिष्ठ महाविद्यालयांनी कोणतेही शुल्क न घेता प्रवेशपत्राची प्रत विद्यार्थ्यांना प्राचार्यांनी सही शिक्का मारून उपलब्ध करून द्यायची आहे. (Education)
बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत होणार असून तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ ते २० फेब्रुवारी या दरम्यान घेतली जाणार आहे. त्याआधी शिक्षण मंडळातर्फे २२ जानेवारी पासून परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे.
प्रवेशपत्रामध्ये नाव, छायाचित्र, स्वाक्षरी यांबाबत दुरुस्त्या असतील तर शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी ते विभागीय मंडळात जावून दुरुस्त करून घ्यायच्या आहेत. तसेच प्रवेशपत्र देताना कोणतेही शुल्क न आकारता विद्यार्थ्यांना त्याची प्रत उपलब्ध करून द्यावयाची आहे. प्रवेशपत्रावरील छायाचित्र सदोष असेल तर त्यावर विद्यार्थ्याचे छायाचित्र चिकटवून प्राचार्यांनी त्यावर शिक्का मारून सही करायची आहे. तसेच प्रवेशपत्र हरवल्यास शाळा-महाविद्यालयांनी प्रवेशपत्राची दुसरी प्रत विद्यार्थ्यांना द्यायची आहे. मात्र त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा मारावा असे स्पष्ट करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.