मराठवाड्याला ऊर्जितावस्था प्राप्त करण्याचे आव्हान स्वीकारा; ज्येष्ठ विचारवंत, संशोधक डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे आवाहन

मराठवाडा सेवक प्रतिष्ठानतर्फे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यस्तरीय ‘मराठवाडा रत्न‌’ पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता. या समारंभात डॉ. देगलूरकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 9 Oct 2024
  • 01:18 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मराठवाडा सेवक प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय मराठवाडा रत्न पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहात

पुणे : सातवाहन ते यादव घराणे असा दीर्घ काळ मराठवाडा संपन्न होता. मात्र, येथील माणसांची मागे राहण्याची वृत्ती नडली. ही वृत्ती बदलून विजिगिषु वृत्तीने संघर्ष करत मराठवाड्याला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचे आव्हान स्वीकारा, असे आवाहन डेक्कन अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती, ज्येष्ठ विचारवंत आणि मूर्ती शास्त्राचे अभ्यासक, संशोधक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी मंगळवारी (दि. ८) येथे केले.

मराठवाडा सेवक प्रतिष्ठानतर्फे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यस्तरीय ‘मराठवाडा रत्न‌’ पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता. या समारंभात डॉ. देगलूरकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय विमुक्त भटक्या व अर्ध भटक्या जमाती विकास मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री भिकुजी दादा इदाते यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मराठवाडा सेवक संघाचे अध्यक्ष दिनकर चौधरी, उपाध्यक्ष दिनेश सास्तुतकर, सचिव गणेश चौधरी, विवेक जाधव, दत्तात्रेय शिंदे व्यासपीठावर होते.

यावेळी खंडेराव कुलकर्णी (शिक्षकरत्न पुरस्कार), रमेश अंबरखाने (उद्योग रत्न पुरस्कार), प्रदीप नणंदकर, (आदर्श पत्रकारिता पुरस्कार), रमाकांत जोशी (आरोग्यरत्न पुरस्कार), धनंजय गुडसुरकर (साहित्यरत्न पुरस्कार), सुधाकर जाधवर (शिक्षणरत्न पुरस्कार), मंगेश बोरगावकर (संगीतरत्न पुरस्कार), दिनेश वैद्य (औद्योगिक सुरक्षा पुरस्कार), गौतम बनसोडे (उद्योगरत्न पुरस्कार), संदीप पंचवाटकर (कलारत्न पुरस्कार), परमेश्वर पाटील (उद्योगरत्न पुरस्कार) यांचा‌‘मराठवाडा रत्न‌’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.

दीपप्रज्वलनाने तसेच प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांचे स्वागत मराठवाडा सेवक संघाचे अध्यक्ष दिनकर चौधरी यांच्या हस्ते झाले. यानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. डॉ. देगलूरकर यांनी मराठवाड्याचा ऐतिहासिक, सामाजिक, साहित्यिक वारसा मनोगतातून उलगडला. मराठवाडा ही संतांची भूमी आणि रत्नांची खाण आहे. महानुभाव, ज्ञानेश्वरी, एकनाथी साहित्याची निर्मिती इथे झाली. अनेक क्षेत्रांत मराठवाड्याचे योगदान महत्त्वाचे आहे. मात्र, येथील माणसांची आहे त्यातच समाधान मानण्याची वृत्ती बदलली पाहिजे. योग्य आणि रास्त मागण्यांसाठी मराठवाड्याने भांडले पाहिजे आणि मागासलेला मराठवाडा ही ओळख पुसून विकसित मराठवाडा निर्माण केला पाहिजे, असे ते म्हणाले.

भिकुजी इदाते म्हणाले, प्रतिष्ठानने मराठवाड्यातील विविध क्षेत्रातील प्रतिभेचा सन्मान केला, हे महत्त्वाचे आहे. मराठवाड्यात प्रचंड गुणवत्ता आहे. महान परंपरा आहे. गरज आहे ती, या समृद्ध परंपरा नव्या पिढीशी जोडण्याची. देशाच्या जडणघडणीत वंचितांचे फार मोठे योगदान आहे. आचार, विचार, उच्चार आणि संस्कार याद्वारे संस्कृती प्रकट करण्याची प्रक्रिया पुन्हा जागी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीचे पाथेय मराठवाड्यात आहे,’.

भाऊसाहेब जाधव म्हणाले, मागील पिढ्यांच्या समर्पण आणि त्यागावर आजचा काळ उभा असतो. आजचा मागासलेला मराठवाडा पुन्हा विकसित करण्यासाठी सहवेदना गरजेची आहे.’ पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या वतीने रमाकांत जोशी, धनंजय गुडसुरकर, सुधाकर जाधवर आणि रमेश अंबरखाने यांनी मनोगत व्यक्त केले. 

मराठवाडा सेवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर चौधरी यांनी प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती देऊन ते म्हणाले,  मराठवाड्याच्या भूमीने अनेक क्षेत्रांत भूषणावह कार्य केलेल्या व्यक्तींना जन्म दिला आहे. ही परंपरा अखंडित आहे. या परंपरेचा सन्मान म्हणून मराठवाड्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest