दुचाकीवर बालक? मग वेग '४०'चाच!

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गेल्या वर्षी १५ फेब्रुवारी रोजी लागू केलेल्या नवीन नियमांनुसार कोणत्याही दुचाकीचालकाला ४० किमी प्रतितास वेगाने गाडी चालवण्याची परवानगी नाही; ४ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाने हेल्मेट घालणे आवश्यक आहे आणि नऊ महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या, परंतु ४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाने सुरक्षासाधने वापरणे आवश्यक आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 18 May 2023
  • 11:25 am

दुचाकीवर बालक? मग वेग '४०'चाच!

लहान मूल सोबत असताना दुचाकी वेगाने चालवणे गुन्हा; वाहतूक पोलीस अनभिज्ञच, एकही कारवाई नाही

अंकित शुक्ला

feedback@civicmirror.in

केंद्रीय  रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गेल्या वर्षी १५ फेब्रुवारी रोजी लागू केलेल्या नवीन नियमांनुसार कोणत्याही दुचाकीचालकाला ४० किमी प्रतितास वेगाने गाडी चालवण्याची परवानगी नाही; ४ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाने हेल्मेट घालणे आवश्यक आहे आणि नऊ महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या, परंतु ४  वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाने सुरक्षासाधने वापरणे आवश्यक आहे. मात्र, दुचाकीस्वार अनेकदा तान्ह्या-लहान मुलांना सोबत घेऊन वाहन चालवण्याची कसरत करत असतात. कधी-कधी मुलाची मान एका बाजूला कललेलीही दिसते, कधी मूल आई-वडिलांच्या मध्ये उभे असते, तर कधी लहान मुलाला आई एका हाताने धरून वेगाने  गाडी हाकत असते. हे सर्व नियमबाह्य आहे. मात्र, या नव्या नियमाची माहितीच नसल्याने वाहतूक पोलीस आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी अद्याप एकही कारवाई केलेली नाही. 

प्रत्यक्षात असा नियम असूनही त्याची अंमलबजावणी  होत नसल्याचे 'परिसर'चे संस्थापक सदस्य रणजित गाडगीळ यांनी ट्वीट केले होते. ते म्हणाले, "अनेक लोक हेल्मेट घालताना दिसतात, परंतु त्यांच्या मुलांनी हेल्मेट घातले की नाही हे ते पाहात नाहीत. हे नियम केंद्रीय मोटार वाहन नियमांचा भाग म्हणून बनवण्यात आले असल्याने, ते पूर्ण देशात लागू आहेत. मात्र, राज्य सरकार किंवा पोलिसांकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. या नियमाविषयी जागरुकता निर्माण केली पाहिजे."

गाडगीळ यांच्या मते, "मोटारसायकलवरून प्रवास करण्यापेक्षा इतर सुरक्षित पर्याय तयार करणे गरजेचे आहे. लोकांना सुरक्षितपणे चालता येईल असे रस्ते, सायकल आणि बस असे पर्याय निर्माण करणे गरजेचे आहे."

साहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले, "अतिवेगाचा नियम सर्वांसाठी सारखाच आहे. दुचाकीस्वार मूल घेऊन जात असतील किंवा नसतील तरीही वेगाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आम्ही सातत्याने कारवाई करत आहोत."  फेब्रुवारी २०२२ च्या अधिसूचनेबद्दल फारशी कल्पना नव्हती, अशी कबुलीही त्यांनी दिली. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजय मगर यांच्या म्हणण्यानुसार, "सामान्य प्रकरणांमध्ये वाहनाचा वेग ताशी ६० किमीपेक्षा जास्त असेल, तर ते दंडनीय आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, जुना कायदा, कलम -१२८  मध्ये, हा वेगाचा नियम आधीच समाविष्ट आहे. या नियमानुसार मोटारसायकलवर फक्त दोन व्यक्तींनाच (लहान असो किंवा मोठे मूल) परवानगी आहे. ती व्यक्ती/मूल चालवणाऱ्याच्या मागील सीटवर बसलेले असणे आवश्यक आहे."

"केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या मध्ये, नियम १३८ मध्ये, उपनियम (६ ) मध्ये  स्पष्टपणे नमूद केले आहे की, कोणत्याही मुलाला इंधन टाकीवर बसण्याची किंवा मागे बसलेल्या व्यक्तीच्या मांडीवर नेण्याची परवानगी नाही. आता नवीन नियम जारी करण्यात आले आहेत, जे १५ फेब्रुवारी २०२२ पासून लागू झाले आहेत ते आणखी कडक आहेत", असेही मगर म्हणाले. 

वाहतूक पोलिसांच्या मते, एप्रिल २०२२  ते फेब्रुवारी, २०२३  पर्यंत एकूण ३७२४ अतिवेगाने वाहन चालवणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे, मात्र लहान मुलाला सोबत घेऊन अतिवेगाने जाणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest