मुसळधार पावसाचे मावळातील ८ गावांचा संपर्क तुटला, नदीवरील पूल गेला वाहून

मावळ तालुक्यातील वडीवळे गावच्या हद्दीत गुरुवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे नदीपात्रात भराव टाकून तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता गुरुवारी रात्री वाहून गेला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 1 Jul 2023
  • 01:04 pm
heavy rains : मुसळधार पावसाचे मावळातील ८ गावांचा संपर्क तुटला, नदीवरील पूल गेला वाहून

मुसळधार पावसाचे मावळातील ८ गावांचा संपर्क तुटला

राज्यभरासह पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे मावळ तालुक्यातील वडीवळे गावच्या हद्दीत गुरुवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे नदीपात्रात भराव टाकून तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता गुरुवारी रात्री वाहून गेला आहे. यामुळे परिसरातील आठ गावांचा संपर्क तुटला आहे.

मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील वडीवळे गावच्या हद्दीमध्ये नव्याने उभारण्यात येत असलेल्या पुलाशेजारीच वाहतुकीसाठी मातीचा भराव टाकण्यात आला होता. गुरुवारी पावसामुळे नदीपात्रात भराव टाकून तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता वाहून गेला. यामुळे तालुक्यातील बुधवडी, वडीवळे, नेसावे, खांडशी, वळख, वेल्हवळी, सांगिसे, उंबरवाडी या गावांचा संपर्क तुटला आहे.

सद्य:स्थितीत या आठ गावांना कामशेत शहराशी जोडणाऱ्या पर्यायी मार्गाची अवस्था बिकट असून स्थानिकांना मुंढावरेमार्गे वळख या कच्च्या चिखलमय रस्त्याने प्रवास करावा लागणार आहे. या पर्यायी मार्गाची वेळीच डागडुजी होणे गरजेचे होते. मात्र, या गंभीर समस्येकडे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेने कानाडोळा केल्याने नागरिकांना सुमारे १५ ते २० किलोमीटरचा वळसा घालून उंबरवाडीमार्गे गोवित्री ते कामशेत असा प्रवास करावा लागणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest