Prisoner News : शिक्षणाने दिली १५९ कैद्यांना शिक्षेत माफी

राज्यातील विविध कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी राबविल्या जात असलेल्या शैक्षणिक उपक्रमांद्वारे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या कैद्यांना ९० दिवसांच्या शिक्षेची माफी दिली जात आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sat, 7 Oct 2023
  • 11:27 am
Prisoner News

शिक्षणाने दिली १५९ कैद्यांना शिक्षेत माफी

लक्ष्मण मोरे
राज्यातील विविध कारागृहांमध्ये (prison)शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी (prisoner) राबविल्या जात असलेल्या शैक्षणिक उपक्रमांद्वारे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या कैद्यांना ९० दिवसांच्या शिक्षेची माफी दिली जात आहे. आतापर्यंत १४५ कैद्यांनी ९० दिवस विशेष माफीचा लाभ घेतला असून १४ कैद्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्याने पुन्हा ९० दिवसांची माफी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र कारागृह विभाग, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली यांच्या मार्फत हा उपक्रम राबविला जात असल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक तथा महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

कैद्यांचे प्रलंबित शिक्षण पूर्ण करून शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्याचे काम कारागृहातील अभ्यासकेंद्राद्वारे केले जात आहे. पदवी शिक्षण पूर्ण करणाऱ्या कैद्यांना ९० दिवसांपर्यंत माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यास आणखी ९० दिवसांची माफी दिली जाणार आहे. विविधतापूर्ण शैक्षणिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कारागृहातील कैद्यांना अधिक चांगले जीवन जागता यावे, यासाठी शिक्षण देण्यात येत आहे. कारागृहातून सुटल्यानंतर समाजाने त्यांना सन्मानाने स्वीकारावे, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत कारागृहाची प्रतिमा उंचावण्यासाठी हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कारागृहातून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर कैद्यांना शिक्षेमध्ये विशेष माफी दिल्यास त्यांना त्यांच्या कुटुंबात लवकर परतता यावे तसेच उर्वरित जीवन कुटुंबासमवेत सन्मानाने जगता यावे असा हेतू यामागे असल्याचे गुप्ता म्हणाले.

राज्यातील कारागृहात विविध गुन्ह्यातील आरोपी शिक्षा भोगत आहेत. कारागृहात कैद्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी शिक्षण विभाग स्थापन करण्यात आलेला असून राज्यातील ९ मध्यवर्ती व १ जिल्हा कारागृहामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक व इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली यांची अभ्यासकेंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत. शिक्षण विभागासाठी कारागृह विभागामार्फत शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शिक्षकांमार्फत विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रातून त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते. तसेच, कारागृहातच अधीक्षक व तुरुंगाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली विद्यापीठाची विभागीय केंद्रे आणि  कारागृह विभागाचे शिक्षक यांच्या मदतीने  परीक्षांचे आयोजन केले जाते. विशेष पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय) डॉ. जालिंदर सुपेकर हे या उपक्रमाचे शैक्षणिक संनियंत्रण करीत आहेत. सद्यस्थितीत येरवडा, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, मुंबई, तळोजा, ठाणे, औरंगाबाद, नाशिक या मध्यवर्ती कारागृहांमध्ये व कल्याण जिल्हा कारागृह अशा एकूण १० कारागृहात विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र कार्यरत आहेत. विशेष माफी सवलतीमुळे काही कैदी लवकर मुक्त होऊन ते आपल्या परिवारात परत गेले आहेत. विशेष शैक्षणिक माफी मिळत असल्याने कारागृहातून शिक्षण घेण्यासाठी अनेक कैदी प्रेरित होत आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रमात मुख्यतः समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, हिंदी, मराठी या विषयाची निवड केली जाते. शिक्षणामुळे तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर चांगले जीवन जगण्याची संधी या कैद्यांना मिळत आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest