रस्ता हस्तांतरित करून काम मार्गी लावण्याची मागणी
पुणे महापालिकेत समावेश झालेल्या वाघोलीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पीएमआरडीएच्या माध्यमातून वाघोली गावात वाघेश्वर मंदिर ते लाईफ लाईन हॉस्पिटलपर्यंत तेराशे मीटर रस्त्याचे काम जवळपास अकरा कोटी रुपये खर्च करून करण्यात आले होते. हे काम करत असताना स्थानिक नागरिक, राजकीय व्यक्ती तसेच अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष न दिल्याने संबंधित ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे हे काम केले होते.
आता या रस्त्याची व फुटपाताची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या तेराशे मीटरमध्ये केलेल्या कामाची देखभाल दुरुस्ती संबंधित ठेकेदाराकडून होणे गरजेचे असताना देखील फुटपाथ व इतर कोणत्याही प्रकारची देखभाल दुरुस्ती झाली नसल्यामुळे नागरिक, वाहनधारक व ग्रामस्थ यांना दैनंदिन त्रास सहन करावा लागत आहे, याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होत आहे.
ही बाब लक्षात घेऊन वाघोलीतील श्री शिवछत्रपती प्रतिष्ठानच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार करून तात्काळ हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतर करून घेऊन त्याचे काम चालू करावे याची मागणी हायब्रीडायमुनिटी प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांच्याकडे केली आहे.
याविषयी कार्यकारी अभियंता यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आल्याची माहिती श्री शिवछत्रपती प्रतिष्ठानचे कल्पेश जाचक यांनी दिली. तसेच लवकरच हे काम चालू करून खराब झालेला भावडी रोड जंक्शन, डोमखेल रोड, केअर हॉस्पिटल रोड व केसनंद फाटा चौक जंक्शन यांची ही सुधारणा करण्यात येईल, यामुळे काही प्रमाणात का होईना वाघोलीतील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल, अशी मागणी करण्यात आली आहे.
वाघोलीतील श्री शिव छत्रपती प्रतिष्ठानचे शिवदास पवार म्हणाले की, “वाघेश्वर मंदिर ते लाईफ लाईन हॉस्पिटल तेराशे मीटर रस्ता पीएमआरडीकडून पाच वर्षांपूर्वी विकसित करण्यात आला होता. परंतु रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. वाघेश्वर चौक, आव्हळवाडी चौक, केसनंद फाटा, या दरम्यान खड्ड्याचे साम्राज्य झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने बेल्हेकर पाटील इंफ्रा यांना तेराशे मीटरचे रोडचे डांबरीकरणाचे काम करण्याचे आदेश द्यावा, काम झाल्यास वाघोली गावातील वाहतूक कोंडी मध्ये सुधारण्यास २५ ते ३० टक्के फरक दिसून येईल.”
पुणे जिल्हा युवासेना प्रमुख डॉ. गणेश सातव म्हणाले की, “पीएमआरडीएच्या माध्यमातून वाघोलीमध्ये वाघेश्वर मंदिर ते लाईफ लाईन हॉस्पिटलपर्यंत केलेल्या तेराशे मीटर रस्त्याच्या कामाची तात्काळ चौकशी लावावी. संबंधित काम करणाऱ्या ठेकेदार व त्या वेळेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशीअंती गुन्हे दाखल करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहे.”
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.