‘डीआरडीओ’चे संचालक प्रदीप कुरुलकरांविरुद्ध एक हजार ८३५ पानांचे दोषारोपपत्र दाखल

कुरुलकरांची पॉलिग्राफ आणि व्हॉईस क्लीअर अॅंड सायकॉलॉजिकल टेस्ट करण्यास परवानगी देण्याची मागणीही एटीएसकडून न्यायालयात करण्यात आली आहे. या मागणीवर आता ७ जुलैला सुनावणी होणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 1 Jul 2023
  • 12:21 pm
Pradeep Kurulkar : ‘डीआरडीओ’चे संचालक प्रदीप कुरुलकरांविरुद्ध एक हजार ८३५ पानांचे दोषारोपपत्र दाखल

प्रदीप कुरुलकर

एटीएसने पुण्यातील विशेष न्यायालयात आरोपपत्र केले दाखल

डीआरडीओचे संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्याविरुद्ध राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) १ हजार ८३५ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात शुक्रवारी दाखल केले. पुण्यातील विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर कुरुलकरांची पॉलिग्राफ आणि व्हॉईस क्लीअर अॅंड सायकॉलॉजिकल टेस्ट करण्यास परवानगी देण्याची मागणीही एटीएसकडून न्यायालयात करण्यात आली आहे. या मागणीवर आता ७ जुलैला सुनावणी होणार आहे.

कुरुलकर सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. कुरुलकर यांना अटक करण्यात आल्यानंतर साठ दिवसांच्या आत त्यांच्याविरुद्ध विशेष न्यायाधीश कचरे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात डीआरडीओचे संचालक असताना प्रदीप कुरुलकर हे झारा दासगुप्ता या महिलेशी मोबाईल वॉट्सअप आणि ईमेलच्या माध्यमातून संपर्कात होते.

झारा दासगुप्ता या नावाने बनावट अकाऊंट पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणांकडून चालवण्यात येत होते. कुरुलकरांनी झारा दासगुप्ताला भारताच्या क्षेपणास्त्र मोहिमेबद्दल संवेदनशील माहिती दिली. कुरुलकर भारताच्या डीआरडीओच्या वेगवेगळ्या लॅबोरेटरीजची माहिती देखील पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणाना देत होते, असा ठपका ठेवण्यात आला आहे.

कुरुलकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेला मोबाइल संच, इलेक्ट्रॉनिक साहित्याचे न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत विश्लेषण करण्यात आले आहे. त्यांनी संपर्क साधण्यासाठी वापरलेला क्रमांक, पुरवलेल्या माहितीत छेडछाड केल्याचे उघडकीस आले आहे. बंगळुरूतील हवाई दलातील कनिष्ठ कर्मचारी निखिल शेंडे यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. कुरुलकर यांनी झारा दासगुप्ताचा मोबाइल क्रमांक ब्लॉक केला होता, असेही आरोपपत्रात म्हटले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest