Pune city : पुणेकरांनी पुन्हा अनुभवला 'लॉकडाऊन'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठीचा कडक बंदोबस्त आणि बॅरिकेडिंगमुळे चार तास शहराचा मध्यभाग मनुष्यविहीन असल्याचे पाहायला मिळाले. रस्ते आणि दुकाने बंद असल्याने पुणेकरांच्या लॉकडाऊनच्या आठवणी जाग्या झाल्या. शहराच्या मध्यवर्ती भागात मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Wed, 2 Aug 2023
  • 10:48 am
पुणेकरांनी पुन्हा अनुभवला 'लॉकडाऊन'

पुणेकरांनी पुन्हा अनुभवला 'लॉकडाऊन'

मोदींच्या दौऱ्यासाठीचा कडक बंदोबस्त आणि बॅरिकेडिंगमुळे शहराचा मध्यभाग चार तास मनुष्यविहीन; दुकाने बंद, नोकरदारांचे हाल

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठीचा कडक बंदोबस्त आणि बॅरिकेडिंगमुळे चार तास शहराचा मध्यभाग मनुष्यविहीन असल्याचे पाहायला मिळाले. रस्ते आणि दुकाने बंद असल्याने पुणेकरांच्या लॉकडाऊनच्या आठवणी जाग्या झाल्या. शहराच्या मध्यवर्ती भागात मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्यात आली होती. मध्यवर्ती ठिकाणचे अनेक रस्ते बंद ठेवण्यात आले होते. वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती. एरवी कायम वर्दळीने गजबजलेले रस्ते अक्षरशः निर्मनुष्य असल्याने नागरिकांच्या कडकडीत लॉकडाऊनच्या आठवणी ताज्या झाल्या. 

पुणे शहरात मेट्रोच्या दुसऱ्या मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  हस्ते करण्यात आले. तसेच, त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. मोदी येणार असल्याने मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या स्वागताची तयारी सुरू होती. आठ दिवसांपासून शहरात सर्वत्र मोदींच्या आगमनाची चर्चा सुरू होती. त्यासाठी प्रशासन बंदोबस्ताची रंगीत तालीम करत होते. कार्यक्रमासाठी निमंत्रितांना वेळेत पोहचण्याकरीता त्यांच्या वाहनांना कोणताही अडथळा होणार नाही याची वाहतूक पोलिसांनी दक्षता घेतली होती. शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमाकरिता असलेल्या या दौऱ्यादरम्यान शहरातील शाळा, महाविद्यालये, आस्थापना, दुकाने, कार्यालये, यांना सुट्टी देण्यात आली होती, तर काहींना अर्ध्या दिवसासाठी दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आले होते. पीएमपीएलच्या बसही धावताना दिसत नव्हत्या. 

मोदींच्या कार्यक्रम स्थळाजवळच्या परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आला होता. वाहतूक विभागाचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी प्रसिद्धिपत्रक काढून याबाबत माहिती दिली होती. सर परशुरामभाऊ महाविद्यालय चौकातील रस्त्यात बदल करून टिळक रस्त्याने एस. पी. कॉलेज चौकात येऊन साने गुरुजी रस्त्याने ना. सी. फडके चौकाकडे जाण्याकरीता (एस.पी. कॉलेज चौकातील) उजवीकडे जाणारा मार्ग खुला करण्यात आला होता. तसेच, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, रा. गो बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रस्ता, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रस्ता काही काळ बंद करण्यात आला होता. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. 

फेरीवाले रस्त्याच्या बाजूच्या कोपऱ्यात उभे राहून पंतप्रधान कधी जातात याचीच वाट पाहात असल्याचे त्यांनी सीविक मिररशी बोलताना सांगितले. लक्ष्मी रस्ता कधी बंद नसतो. अगदी सोमवारीसुद्धा निम्मी दुकाने सुरू असतात. मंगळवारी मात्र सगळे व्यापारी पंतप्रधान कधी येऊन जातात, याची वाट पाहात असल्याचे येथील नागरिक राजेंद्र शिंदे यांनी सीविक मिररशी बोलताना सांगितले. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story