Symbiosis College professor arrested : धार्मिक भावना दुखावल्याने प्राध्यापकास अटक

वर्गात शिकवत असताना हिंदू देव-देवतांबद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपावरून सिम्बायोसिस कॉलेजच्या एका प्राध्यापकास अटक करण्यात आली आहे. याबाबतचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित प्राध्यापकाला अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Fri, 4 Aug 2023
  • 12:33 pm
धार्मिक भावना दुखावल्याने प्राध्यापकास अटक

धार्मिक भावना दुखावल्याने प्राध्यापकास अटक

प्राध्यापकाविरुद्ध सिम्बायोसिस महाविद्यालयासमोर अभाविपचे आंदोलन, प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई, पोलिसांनी केली अटक

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

वर्गात शिकवत असताना हिंदू देव-देवतांबद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपावरून सिम्बायोसिस कॉलेजच्या एका प्राध्यापकास अटक करण्यात आली आहे.  याबाबतचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित प्राध्यापकाला अटक केली आहे. महाविद्यालय प्रशासनानेही प्राध्यापकाला निलंबित केले आहे.

अशोक सोपान ढोले (वय ४३, रा सिंहगड रोड,  धायरी फाटा, वडगांव बुद्रुक) असे अटक केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. या प्रकरणी समस्त हिंदू बांधव समितीचे अध्यक्ष रवींद्र दिलीप पडवळ यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जुलै रोजी दुपारी १ च्या दरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांचा हिंदीचा तास ढोले घेत होते.  यावेळी त्याने  हिंदू देव-देवतांविषयी वादग्रस्त उल्लेख केल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. एका विद्यार्थ्याने ढोलेचा व्हीडीओ रेकॉर्ड करून ट्विटर हँडलवर अपलोड केला. हा  व्हीडीओ व्हायरल झाल्यावर काही संघटनांनी त्याची दखल घेतली. आक्षेपार्ह भाष्य करून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत. हिंदू धर्माचा अपमान  करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक अशी विधाने केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गुरुवारी सकाळी सिम्बायोसिस महाविद्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

 महाविद्यालयाचे प्राचार्य हृषिकेश सोमण ‘मिरर’ शी बोलताना म्हणाले की, काही लोकांनी आम्हाला प्राध्यापक ढोले याचा व्हीडीओ  दाखवला. त्याची दखल घेऊन आम्ही त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला.  सिम्बायोसिस सोसायटी कोणत्याही धर्मासाठी वापरलेले असे शब्द सहन करू शकत नाही. या वादाची चौकशी करण्यासाठी आम्ही समिती गठित केली आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सचिव अनिल ठोंबरे यांनी ‘मिरर’ शी बोलताना सांगितले की, "हिंदू धर्माचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही.  प्राध्यापक ढोले याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे. त्याने जे विधान केले ते पिढी घडवणाऱ्या प्राध्यापकाला शोभणारे नाही. हा प्रकार लज्जास्पद आहे.

 अभाविपच्या सदस्य प्रगती कराडे म्हणाल्या की, “ विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी प्राध्यापकाची असते. अशा वेळी जर प्राध्यापकच त्यांच्या मनात तेढ निर्माण करण्याचे काम करत असतील तर  त्यांना वेळीच थांबवावे. प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान आहे आणि असायलाच हवा. इतर धर्माचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. शिकवताना ते अनेकदा हिंदू देव-देवतांचा अपमान करणारी उदाहरणे देत असतात. यावरून संबंधित प्राध्यापक विकृत प्रवृत्तीने विद्यार्थ्यांसमोर आक्षेपार्ह विधाने करत असल्याचे दिसून येते. ही घटना गंभीर आहे. संबंधित तक्रारी प्रशासनाकडे येत असतील, इतर ठिकाणी अशा घटना घडत असतील तर प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच कायदेशीर कारवाई करावी.

संबंधित प्राध्यापकाने अशा प्रकारची विधाने करून यापूर्वी विद्यार्थ्याच्या भावना दुखावल्या होत्या. मात्र, हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पहिल्यांदाच ही बाब समोर आली आहे, असे एक विद्यार्थी ईशान अभियानकर याने सांगितले.

डेक्कन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिपीन हसबनीस यांनी ‘मिरर’शी बोलताना सांगितले की, बुधवारीआम्हाला प्राध्यापकाविरोधात तक्रार आली होती. गुरुवारी रवींद्र दिलीप पडवळ यांनी प्राध्यापकाविरुद्ध फिर्याद दिली आहे.  त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे. आम्ही या प्रकरणाची कसून चौकशी करत आहोत.

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती आणि प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांनी ‘मिरर’ शी बोलताना सांगितले की, संबंधित प्राध्यापकाला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.  ते २००५ पासून हिंदी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. विद्यापीठ प्रशासनाकडून अंतर्गत समितीमार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story