चोऱ्या रोखण्यासाठी पालखी मार्गावर पोलीस सज्ज

शहरात संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येत असून दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात. या गर्दीत चोरटे अलगद दागिने चोरून नेतात. गेल्या वर्षी जेथे गुन्हे झाले होते तेथे अनुभवी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके तैनात आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस थेट वारकऱ्यांच्या वेशात पालखीत सहभागी होणार आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sun, 11 Jun 2023
  • 12:00 am
चोऱ्या रोखण्यासाठी पालखी मार्गावर पोलीस सज्ज

चोऱ्या रोखण्यासाठी पालखी मार्गावर पोलीस सज्ज

मोबाईल, सोनसाखळी हिसकावणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस वारकऱ्यांच्या वेशात पालखी सोहळ्यात

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

शहरात संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येत असून दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात. या गर्दीत चोरटे अलगद दागिने चोरून नेतात. गेल्या वर्षी जेथे गुन्हे झाले होते तेथे अनुभवी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके तैनात आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस थेट वारकऱ्यांच्या वेशात पालखीत सहभागी होणार आहेत. साध्या वेशात लोकांमध्ये मिसळून पालखी सोहळ्यावर त्यांची नजर असणार आहे. तसेच सर्व्हेलन्स व्हॅन, ड्रोन, सीसीटीव्ही, वॉच टॉवर, व्हीडीओग्राफी आदींच्या माध्यमातून पोलिसांची गुन्हेगारांवर करडी नजर असणार आहे.

मागील वर्षी पिंपरी-चिंचवडमध्ये खास पथके तैनात केल्याने १०० हून अधिक सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघड झाले होते, तर ५० हून अधिक  आरोपींना पकडले होते. त्यामुळे यंदाही ही पथके तैनात केली असून त्यांनी दोघांना अटक करत चोरीचे मोबाईल फोन जप्त केले आहेत. पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस दलाने कडक बंदोबस्त ठेवला आहे. पालखीचा १२ आणि १३ जूनला पुण्यात मुक्काम असणार आहे. यावेळी भाविकांचा मोठा जनसमुदाय एकत्र जमतो. त्या गर्दीचा फायदा घेऊन मौल्यवान किमती वस्तू चोरण्याचे प्रकार होतात. त्यामध्ये  महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि मोबाईल चोरीचे प्रमाण अधिक असते. हे टाळण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या सूचनेनुसार बंदोबस्तासाठी पिंपरी-चिंचवड तसेच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची खास पथके तैनात केली आहेत.

गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने हडपसर आणि वानवडी येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे रोखण्यासाठी गस्त वाढवल्या आहेत. वारकऱ्यांचे मोबाईल आणि मौल्यवान वस्तूंची चोरी करण्याच्या उद्देशाने चोर फिरत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचला. पुणे-सोलापूर रस्त्यावर हडपसर येथील रवीदर्शन चौकासमोरील बस थांब्यावर श्रीकांत राजू जाधव (रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) आणि  दिलीप बलभीम गायकवाड (रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची तपासणी केली असता १ लाख १० हजारांचे एकूण सात मोबाईल फोन आढळून आले.

याबाबत दोघांनाही व्यवस्थित माहिती सांगता आली नाही. चौकशीत हे मोबाईल फोन हडपसर, मुंढवा, बंडगार्डन, बिबवेवाडी या भागातून गर्दीचा फायदा घेऊन चोरल्याचे त्यांनी सांगितले. चोरटे हे मोबाईल कर्नाटकात विक्रीसाठी पाठवणार होते. या प्रकरणी मुंढवा, हडपसर, बिबवेवाडी, बंडगार्डन  या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल केला आहे.  

श्रीकांत जाधव याच्यावर यापूर्वी घरफोडी, पाकिटमारी, मोबाईल चोरी असे २४ गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ५ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी दिली.

गतवर्षी जेथे गुन्हे झाले होते तेथे अनुभवी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके तैनात आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस थेट वारकऱ्यांच्या वेशात पालखीत सहभागी होणार आहेत. साध्या वेशात लोकांमध्ये मिसळून पालखी सोहळ्यावर त्यांची नजर असणार आहे. तसेच सर्व्हेलन्स व्हॅन, ड्रोन, सीसीटीव्ही, वॉच टॉवर, व्हीडीओग्राफी आदींच्या माध्यमातून पोलिसांची गुन्हेगारांवर करडी नजर असणार आहे. मागील वर्षी पालखी मार्गावर बीड, सोलापूर, अहमदनगर, नांदेड, पिंपरी-चिंचवड, पुणे या भागातील चोरट्यांनी सोनसाखळी चोरीचे प्रकार केले होते . या वर्षी त्या गुन्हेगारांवर संबंधित शहरातील पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story