मुलींवरील हल्ले रोखण्यासाठी पोलिसांचा समुपदेशनाचा मार्ग

शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने गुन्हे रोखण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. दर्शना पवारची हत्या झाल्यानंतर लगेचच एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने हल्ला झाल्याने समाजमन सुन्न झाले होते. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी असे हल्ले होत असल्याने महिला-मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Fri, 30 Jun 2023
  • 09:27 am
मुलींवरील हल्ले रोखण्यासाठी पोलिसांचा समुपदेशनाचा मार्ग

मुलींवरील हल्ले रोखण्यासाठी पोलिसांचा समुपदेशनाचा मार्ग

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने गुन्हे रोखण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. दर्शना पवारची हत्या झाल्यानंतर लगेचच एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने हल्ला झाल्याने समाजमन सुन्न झाले होते. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी असे हल्ले होत असल्याने महिला-मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे. शहरात भीतीचे वातावरण असून महिला, मुलींमध्ये घबराट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक हे पोलीस प्रशासनावर नाराज असून कायदा सुव्यवस्था राखण्यास त्यांना येत असलेल्या अपयशावर बहुसंख्य नागरिक समाज माध्यमावर व्यक्त होत आहेत. अनेकांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदने देऊन गुन्हेगारांना आळा घालण्याची विनंती केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ‘युवा विचार परिवर्तन’ या उपक्रमांतर्गत शहरातील विद्यार्थ्यांचे समुपदेशन सुरू केले आहे.

समुपदेशन उपक्रमाची सुरुवात पूना महाविद्यालयापासून झाली असून हा उपक्रम इतर महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून सोशल आउटरिचद्वारे याची अंमलबजावणी केली जात आहे. त्याद्वारे पूना महाविद्यालयामधील अकरावी आणि बारावीच्या १०० विद्यार्थ्यांचे गुन्हे शाखा युनिट ६ कडून समुपदेशन करण्यात आले आहे.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मळ यांनी वाढती व्यसनाधीनता, युवकातील आकर्षण आणि व्यसनाधीन युवकांची वाढणारी संख्या यावर मार्गदर्शन केले. त्याच्या दुष्परिणामातून स्वतः बरोबरच कुटुंबीयांची हानी होते असे त्यांनी सांगितले. साहजिकच त्याचा सामाजिक जीवनावर दुष्परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

याबरोबरच या उपक्रमामध्ये  विद्यार्थिनींना दैनंदिन प्रवास, सहली, रात्री उशिरापर्यंतचा प्रवास करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत सूचना करण्यात आल्या. समाजमाध्यमाचा अतिवापर, गैरवापराचे तोटे, त्याबाबत घ्यावयाची काळजी, ही माध्यमे योग्यरित्या कशी हाताळावी या विषयी माहिती देण्यात येत आहे. त्यातून सामाजिक सलोखा आणि एकता राखण्यास आवाहन केले जात असून शहरातील सर्व महाविद्यालयात हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यातून शेकडो विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येणार असल्याचे गुन्हे शाखा युनिट-६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल  यांनी सांगितले.

आरके बहुउद्देशीय संस्थेच्या मदतीने या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत असून शहरातील शेकडो युवकांपर्यंत पोहचून त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. नुकत्याच एका तरुणीवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. पुण्यातील सुरक्षा आणि कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चिंता निर्माण झाली. त्यामुळे पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यासाठी दामिनी पथक बळकट आणि अधिक सक्रिय करण्यात येणार आहे. पोलीस गस्तीसाठी बिट मार्शलची संख्या दुप्पट करण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयात समुपदेशन कार्यक्रमाची अंमलबजावणी, नागरिकांना सर्वकाळ मदत मिळावी यासाठी पुण्यातील प्रत्येक पोलीस ठाणे २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे. आयटी कंपन्यांमध्ये महिला सुरक्षेसाठी जागरूकता उपक्रम आयोजित करणे, रिक्षाचालकांच्या परवान्यांची कठोर तपासणी, स्वारगेट, शिवाजीनगर बस स्थानक आणि रेल्वे स्थानकांसारख्या प्रमुख वाहतूक केंद्रांभोवती पोलीस कर्मचारी तैनात करणे अशा अनेक गोष्टी पोलीस राबवणार आहेत. दर्शना पवार हत्या आणि सदाशिव पेठेत तरुणीवर झालेला हल्ला या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक सक्रिय होऊन विविध पातळ्यांवर काम करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story