वायसीएम रुग्णालयात ढेकूण, झुरळांचा सुळसुळाट
नितीन गांगर्डे
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात (YCM hospital) ढेकूण, झुरळांचा सुळसुळाट झाला असून त्यांच्या त्रासामुळे रुग्णांची झोप उडाली आहे. आजारपणामुळे आधीच त्रस्त असलेले रुग्ण रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे ढेकणांची शिकार ठरत आहेत. उपचारासाठी आलेले रुग्ण येथून नवीन आजार घेऊन जात असल्याची कैफियत महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा दक्षता समितीचे सदस्य ॲड. सागर चरण यांनी ‘सीविक मिरर’कडे मांडली. या प्रकाराला वेळीच आळा घालण्यासाठी त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत असलेले यशवंतराव चव्हाण रुग्णालय हे नामांकित तसेच सर्वात मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये विविध भागांतील रुग्ण उपचारांसाठी येत असतात. ग्रामीण आणि शहरी भागातून आलेल्या रुग्णांची रोजची संख्या शेकडोच्या घरात असते. पिंपरी-चिंचवड महापालिकेची ओळख श्रीमंत महापालिका अशी आहे. या महापालिकेमार्फत शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना चांगली वैद्यकीय सेवा देण्यासाठी सुसज्ज असे यशवंतराव चव्हाण रुग्णालय उभारण्यात आले आहे.
वायसीएम रुग्णालयामार्फत पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्रातील आणि कार्यक्षेत्राबाहेरील नागरिकांना मोफत अथवा सवलतीच्या दरामध्ये वैद्यकीय सर्वोपचार सेवा पुरविण्यात येते. रुग्णालयामध्ये बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभाग आहेत. त्यातील आंतररुग्ण भागामध्ये ७५० बेडची सुविधा उपलब्ध आहे. जन्म-मृत्यू नोंदणी, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, रक्तपेढी सेवा, रुग्णवाहिका सेवा अशा अनेक सेवांसोबतच रुग्णालयामध्ये पदव्युत्तर संस्था कार्यरत आहे.
वायसीएममध्ये जिल्ह्यातून हजारो रुग्ण उपचारांसाठी येत असतात. मात्र त्यांना येथे समस्यांच्या डोंगराचा सामना करावा लागतो. येथे उपचारासाठी येणाऱ्या अनेक नागरिकांनी ‘सीविक मिरर’शी बोलताना आपबिती सांगितली. ‘‘रुग्णालय म्हटलं की स्वच्छता हवीच. पण यशवंतराव चव्हाण रुग्णालयात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रुग्णालयात गेलेल्या रुग्णाला या घाणीच्या उग्र वासाचा सामना करावा लागतो. त्यामुळं अनेकदा नाकाला रुमाल लावून किंवा हाताने नाक दाबून पुढे जाण्याची वेळ नागरिकांवर येते. रुग्णालयातील स्टाफ हा उद्धट असून तो रुग्णांसोबत उर्मटपणे वागतो,’’ असा ‘आंखो देखा हाल’ ॲड. चरण यांनी सांगितला. हे सर्व बघता यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नियम आहेत की नाही, असा प्रश्न पडतो.
या नामांकित रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डात ढेकूण आणि झुरळांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. रात्री आराम करत असलेल्या रुग्णांच्या बेडवर ढेकूण आणि झुरळे चढतात. आधीच आजाराने त्रस्त झालेल्या रुग्णांच्या रक्तावर ढेकूण ताव मारत आहेत. ढेकूण आणि झुरळांच्या त्रासामुळे रुग्णांची झोपच उडाली आहे. येथे उपचारासाठी येणाऱ्यांना ही एकप्रकारे शिक्षाच असल्याचे मानले जात आहे. रुग्णांबरोबर आलेल्या त्यांच्या नातेवाइकांनादेखील या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ढेकूण आणि झुरळांचे साम्राज्य वाढले आहे. मात्र अद्यापही त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. याचा त्रास हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, अधिकारी यांनाही होत आहे. महापालिकेच्या आयुक्तांनी वायसीएम रुग्णालयाची तपासणी करून योग्य ती कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी ॲड. चरण यांनी ‘सीविक मिरर’च्या माध्यमातून केली आहे.
रुग्णालयात वेळच्या वेळी साफसफाई होत असते. पेस्ट कंट्रोलसाठी सुलभ एजन्सीला नियमितपणे बोलावले जाते. जुने वार्ड असल्याने फरशा तुटलेल्या आहेत. त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. सहाव्या माळ्यावरील नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामदेखील पूर्ण करण्यात येणार आहे. नवीन फरशा बसवण्यात आल्यावर सगळे व्यवस्थित होईल. जुने फर्निचर, लाकडाची कपाटे यातील लपलेले कीटक काढणे कठीण असते. या वस्तूंचेही नूतनीकरण करण्याचे काम सुरू आहे.
- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय, पिंपरी-चिंचवड
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.