संग्रहित छायाचित्र
शहरामध्ये पिंपरी केंद्रांतर्गत ७३ टक्के तर, आकुर्डी केंद्रांतर्गत येणार्या शाळांमध्ये ६५ टक्के विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी अद्याप तयार झालेले नाहीत, त्यांचे अपार आयडी तयार करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, अपार आयडी बनविण्यासाठी पालकांनी संमती पत्रासाठी शाळांना सहकार्य करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून केले आहे.
केंद्र शासनाकडून मेगा अपार दिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या (मुंबई) वतीने ३० नोव्हेंबर रोजी राज्यामध्ये अपार दिवस साजरा करण्यात आला. त्याला अनुसरून ६ डिसेंबरपर्यंत राज्यातील ६०.७५ टक्के विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांकडून अपार आयडी उपलब्ध करून दिले आहेत.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी अपार आयडी अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे पालकांकडून घेण्यात येणार्या संमतीपत्रासाठी सहकार्य करावे. विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्यासाठी शाळांचे सहकार्य मिळावे, यासाठी त्यांना फोन केले जात आहेत.
महापालिका शिक्षण विभागाकडून सर्व शाळांतील विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार व्हावे, यासाठी मिशन मोडवर काम हाती घेतले आहे. अपार आयडीमधील दुरुस्तीसाठी चिंचवडला शिबिर सुरू आहे, असे प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी सांगितले.
अपार आयडी म्हणजे काय?
ऑटोमेटेड पर्मनंट अॅकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री याचे लघुरुप म्हणजे अपार. अपार हा देशातील पूर्वप्राथमिक ते उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा बारा अंकी कायमस्वरूपी ओळख क्रमांक आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.