संग्रहित छायाचित्र
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) कार्यालयात दोन आयएसआय अधिकारी पदाची नियुक्ती आहे. त्यामुळे करण्याचा वाढता कारभार पाहता कामकाजामध्ये फेरबदल करण्यात आले असून, विकास परवानगी विभागातील कामकाजाचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आता अतिरिक्त आयुक्त म्हणून असलेले दीपक सिंगला यांच्याकडे अधिकार वाढवण्यात आले आहेत. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले असून, प्रशासकीय कामकाजात गतिमानता होणार आहे.
पीएमआरडीएमधील विकास परवानगी विभागात काही प्रस्ताव आयुक्त यांच्याकडे निर्णयासाठी सादर होत होते. त्यापैकी काही अधिकार त्यांनी अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे हस्तांतरित केले आहेत. कामकाजात गतिमानता येण्यासाठी या बाबतचे प्रस्ताव साहाय्यक महानगर नियोजनकार, रचना साहाय्यक यांनी सह/ उप महानगर नियोजनकार यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव दाखल करावे लागणार आहे. यामध्ये अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे एक एकरापर्यंतचे भूखंड क्षेत्र असलेले सर्व प्रस्ताव, सर्व वनघर, शेतघर व पेट्रोल पंपाचे प्रस्ताव, सर्व गुंठेवारी प्रकरणे, वास्तुविशारद / अभियंता नोंदणी प्रकरणे, आकाश चिन्ह परवान्याचे प्रस्ताव, वृक्ष प्राधिकरणाशी संबंधित सर्व प्रस्ताव, वरील प्रस्तावासंबंधीची सर्व न्यायालयीन प्रकरणांच्या कामकाजांचा समावेश करण्यात आला आहे. आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांच्याकडे संबंधित कामकाजाची जबाबदारी सोपवली आहे.
संबंधित कामकाजाव्यतिरिक्त इतर सर्व कामकाज आयुक्त यांच्याकडे निर्णयासाठी येणार आहे. त्यामुळे संबंधित सर्व प्रस्ताव साहाय्यक महानगर नियोजनकार, रचना साहाय्यक यांनी सह / उप महानगर नियोजनकार (विशेष) व संचालक, विकास परवानगी व नियोजन यांच्यामार्फत आयुक्त यांच्याकडे सादर करणे आवश्यक असल्याचा आदेश आयुक्त योगेश म्हसे यांनी दिला आहे. दरम्यान, अतिरिक्त आयुक्तांकडे आता विकास परवानगी विभागाची काही मुख्य जबाबदारी भविष्यात देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
आकाश चिन्ह विभागाला मिळाला अधिकारी
प्राधिकरणात आकाश चिन्ह विभाग अस्तित्वात आला तेव्हा या विभागासाठी स्वतंत्र तहसीलदार नेमण्यात आला होता. त्यामुळे या विभागाची कामे जलदगतीने होत होती. मात्र कालांतराने हा स्वतंत्र असलेला विभाग अनधिकृत बांधकाम निर्मूलन या विभागातील प्रमुखांच्या अंतर्गत वर्ग करण्यात आला. त्यामुळे या विभागासाठी काम करण्यात आलेला अधिकारी, कर्मचाऱ्यांना हे काम पाहून पुन्हा अतिक्रमण निर्मूलन विभागातील वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली होती . त्यामुळे हा विभाग पुन्हा विकास परवानगीकडे आला. त्यानंतर आता अतिरिक्त आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली हा विभाग देण्यात आला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.