संग्रहित छायाचित्र
दापोडी, सांगवीसह पुणे-मुंबई मार्गावर दोन्ही बाजूने निर्माण होणाऱ्या इमारतींना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होण्यासाठी शहरातील सर्वात जास्त रहदारीचा मार्ग असलेल्या निगडी ते दापोडी मार्गावर महापालिकेच्या वतीने बीआरटी मार्गातून नव्याने स्वतंत्रपणे जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या मार्गावर यापूर्वीच मेट्रो, अर्बन स्ट्रीटची कामे सुरू असताना आता जलवाहिनीच्याही कामाची भर पडणार असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे गेली आहे. पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने पवना धरणाचे ५१० एमएलडी, आंद्रा धरणाचे ८० एमएलडी आणि एमआयडीसीचे २० एमएलडी असे एकूण मिळणारे ६१० एमएलडी पाणी सद्यपरिस्थितीत शहराला कमी पडत आहे. पुण्याच्या दिशेला शहराचे टोक असलेल्या दापोडी, फुगेवाडी, सांगवी या भागांत तसेच, पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील नवीन गृहप्रकल्पांना पुरेसे पाणी मिळावे, म्हणून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून निगडी ते दापोडी ही जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.
निगडीच्या सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून ते दापोडीपर्यंत बीआरटी मार्गातून भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. या कामासाठी आठ ठेकेदारांनी निविदा भरल्या. त्यातील गुडविल कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराची ९.३६ टक्के कमी दराची ५२ कोटी ४२ लाख रुपये खर्चाची निविदा स्वीकृत करून या ठेकेदाराला जलवाहिनीचे काम दिले आहे. या कामाची मुदत दोन वर्षे आहे.
निगडी ते दापोडी मार्गाच्या सर्व्हिस रस्त्यावर दोन्ही बाजूने महापालिकेच्यावतीने अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यात पिंपरी ते चिंचवड दरम्यान कामाला सुरूवात झाली आहे. रस्त्यांची रुंदी कमी करून पदपथ व सायकल ट्रॅक बांधण्यात येत. तसेच स्ट्रीट लाईटही उभारण्यात येत आहे. त्यामुळे हा मार्ग आधीच अरूंद झाला आहे. त्यानंतर आता निगडीतील भक्ती-शक्ती समूहशिल्प उद्यानाच्या बाजूच्या सर्व्हिस रस्त्यावरून बीआरटी मार्गातून दापोडीपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.
बीआरटी मार्ग अडथळ्यांची शर्यत
निगडी ते दापोडी या दरम्यान दोन्ही बाजूने बीआरटी सुरू आहे. बीआरटी मार्गासाठी महापालिकेने कोट्यवधी रूपयांचा खर्च केला आहे. मेट्रोच्या कामामुळे हा मार्ग बंद पडतो की काय, अशी शंका वाटत आहे. दुसरीकडे निगडी भक्ती-शक्ती ते मोराडी मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी बीआरटी मार्गात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. मेट्रो, अर्बन स्ट्रीट आणि आता जलवाहिनीच्या कामामुळे सर्व्हिस रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
जलवाहिनीमुळे पाण्याची समस्या सुटेल
शहरात दापोडी ते मोरवाडीपर्यंत मेट्रो धावत आहे. या मेट्रो मार्गामुळे एफएसआय वाढल्याने पुणे-मुंबई महामार्गावरील दोन्ही बाजूने टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. या शेकडो निवासी इमारतींना या जलवाहिनीतून पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे नव्याने तयार झालेल्या इमारतींना पाण्याची समस्या भेडसावणार नाही, असा दावा पाणीपुरवठा विभागाचा आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.