संग्रहित छायाचित्र
औट घटकेच्या सरकार स्थापनेवेळी आणि त्यानंतरच्या दुसऱ्या बंडाळीतही अजित पवार यांच्याबरोबर शेवटपर्यंत साथ देणारे एकमेव आमदार अण्णा बनसोडे हे तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतरही त्यांना मंत्रीपद दिले गेले नाही. त्यामुळे खंत व्यक्त करत आणि नाराजी उघड न करत अण्णा बनसोडे हे अधिवेशन अर्धवट सोडून मतदारसंघात परतले आहेत.
विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर भाजपसोबत सत्ता स्थापन करताना आणि जुलै २०२३ मध्ये शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी होताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत ठाम असलेले पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे हे तिसऱ्यांदा निवडून आल्याने मंत्रिपद मिळेल, असा त्यांना विश्वास होता. परंतु, त्यांना मंत्रिपद दिले गेले नाही. त्यामुळे अधिवेशनात मनही लागत नव्हते असे म्हणत आमदार बनसोडे यांनी अधिवेशन सोडून मतदारसंघात परतले. मात्र, कुटुंबात दुःखद घटना घडल्याने मी अजितदादांची परवानगी घेऊनच मतदारसंघात परतलो असल्याचे अण्णा बनसोडे यांचे म्हणणे आहे. आमदार बनसोडे म्हणाले, यावेळेस मला मंत्रिपद मिळेल अशी माझी अपेक्षा आणि इच्छा होती. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज नक्कीच आहे. मी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आलो आहे. त्यामुळे यावेळेस अजित पवार हे मला मंत्रिपद देतील अशी माझी अपेक्षा होती. पण, अजित पवार दिलेला शब्द नक्कीच पाळतील, असा मला विश्वास आहे. मंत्रिपदाची इच्छा पूर्ण न झाल्याने अधिवेशनात मन लागत नव्हते. लोकांच्या कामांसाठी मतदारसंघात आलो आहे. अजित पवार माझा नक्कीच पुन्हा एकदा विचार करतील, असा माझा विश्वास आहे. यावेळी भ्रमनिरास झाला आहे. यापुढे जनतेची अधिक जोमाने कामे करणार आहे. त्यानंतर तरी मंत्रिपद मिळेल.
२०१७ मध्ये शहरात भाजपने पूर्ण ताकद लावली होती. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि त्यावेळेस सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता एकहाती काबीज केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले. अण्णा बनसोडे हेदेखील राष्ट्रवादीमधून (एकत्रित पक्ष) त्यावेळेस निवडून आले. कालांतराने पक्ष फुटला. तेव्हा अण्णा बनसोडे हे शेवटपर्यंत अजित पवार यांच्याबरोबर होते. अण्णा बनसोडे यांना शरद पवार यांनी फोन करून बोलावून घेतल्यानंतरही ते गेले नाहीत. अण्णा बनसोडे यांना मिळणारे मंत्रिपद हे संजय बनसोडे यांच्या वाट्याला गेले. पुन्हा सरकार पडल्यावर अण्णा बनसोडे हे अजित पवार यांच्याबरोबरच राहिले. तेव्हादेखील त्यांना मंत्रिपद दिले नव्हते.
सध्या शहरांमध्ये भाजपचे चार, राष्ट्रवादीचा एक आमदार आहे. त्यामुळे महापालिकेत ताकद वाढवण्यासाठी अजित पवार हे अण्णा बनसोडे यांना मंत्रीपद देतील अशी सर्वांना खात्री होती. मात्र यावेळीही अजित पवार यांनी अण्णा बनसोडे यांना मंत्रीपद देण्याचे टाळले. यासाठी अनेक कारणे सांगितली जात आहेत. अण्णा बनसोडे यांच्या कट्टर समर्थक कार्यकर्त्यांमध्ये अजित पवार यांच्याबाबत नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.