पीएमआरडीएच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्याविरोधात महिलेचे उपोषण

हक्काच्या जमिनीवर परस्पर प्लॉटिंग करून बांधकाम व्यावसायिकांनी नातेवाईकांना हाताला धरून अनधिकृत बांधकामाचा सपाटा सुरू केला आहे. याबाबत गेल्या दोन वर्षांपासून पीएमआरडीएच्या अतिक्रमण विरोधी विभागाकडे पत्रव्यवहार सुरू आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही हक्काच्या जागेवर बांधकाम; बिल्डर, नातेवाईकांचे संगनमत, पाठपुरावा करूनही पीएमआरडीए निष्क्रिय

हक्काच्या जमिनीवर परस्पर प्लॉटिंग करून बांधकाम व्यावसायिकांनी नातेवाईकांना हाताला धरून अनधिकृत बांधकामाचा सपाटा सुरू केला आहे. याबाबत गेल्या दोन वर्षांपासून पीएमआरडीएच्या अतिक्रमण विरोधी विभागाकडे पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र, कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करून योग्य ती चौकशी करण्याची मागणी महिला तक्रारदार मीनाक्षी मगर यांनी आयुक्तांकडे केली आहे.

मात्र, याबाबत पीएमआरडीएच्या संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे मगर यांचे म्हणणे आहे. या विरोधात उपोषणाचे हत्यार महिलेने उपसले आहे.

लोणीकंद (ता. हवेली) येथील शेतजमीन गट नंबर १६७ प्‍लॉटिंगमधील अनधिकृत बांधकामाविरोधात मगर यांनी उपोषण सुरू केले आहे. सोमवारपासून (दि. २) आकुर्डी येथील पीएमआरडीए प्रवेशद्वारावर हे उपोषण सुरू केले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही लक्ष न दिल्‍याच्‍या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे. यापूर्वी त्यांनी महानगर आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना देखील निवेदन दिले आहे. २०२२ पासून पाठपुरावा सुरू असून देखील दखल घेतली नसल्याचे महिलेची म्हणणे आहे.  

या बाबत मीनाक्षी मगर यांनी सांगितले की,  मौजे लोणीकंद, ता. हवेली, येथील गट नं. १६७ वर पुणे येथील दिवाणी न्यायालयात वाटपाबाबत दावा दाखल केलेला आहे. या मिळकतीमध्ये प्लॉटींग करण्यासाठी रेखांकन किंवा कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी नाही. तरी शेती झोनमध्ये निवासी प्लॉटींग करून जनतेला विक्री करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे. त्या बाबत २०२२ पासून पुराव्यासह कार्यालयाकडे वारंवार हेलपाटे मारले आहे.

सदर बेकायदेशीर बांधकामे पाडण्याबाबत व विना परवानगी केलेले प्लॉटीग रद्द करण्याबाबत कारवाईकडे दुर्लक्ष केले आहे. महावितरणची कोणत्याही प्रकारची मंजुरी न घेता या ठिकाणी चोरून वीज घेत असल्याची तक्रार मीनाक्षी मगर यांनी महावितरणच्या वाघोली शाखेत केली आहे. मात्र, त्याबाबत महावितरण कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळाले नाही. याबाबत अधिकाऱ्यांनी या ठिकाणची पाहणी करून योग्य ती कारवाई करावी, असे निवेदन देण्यात आले आहे. आता कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करणार असल्‍याचे मीनाक्षी मगर यांनी आयुक्‍तांना दिलेल्‍या निवेदनात नमूद केले आहे.

संबंधित बांधकाम प्रकरणी आम्ही माहिती घेतली आहे. या ठिकाणी काम करणाऱ्यांवर रीतसर नोटिस देणार आहे. त्‍यांच्‍यावर कारवाई देखील करण्यात येणार आहे.

- दीप्ती सुर्यवंशी-पाटील,उपायुक्त, अतिक्रमण विरोधी व निर्मूलन पथक, पीएमआरडीए

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest