पिंपरी चिचंवड : विद्यार्थ्यांना महापालिकेत प्रशिक्षणाची संधी

युवकांना प्रत्यक्ष कार्याचा अनुभव देऊन त्यांच्यात रोजगार क्षमता निर्माण करण्यासाठी महापालिकेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.

File Photo

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणातून नोकरी, १६२ उमेदवार विविध विभागांत रुजू, १२० जणांनी केली नोंदणी

युवकांना प्रत्यक्ष कार्याचा अनुभव देऊन त्यांच्यात रोजगार क्षमता निर्माण करण्यासाठी महापालिकेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. त्यानुसार शहरातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन महापालिकेत काम करण्यासाठी नोकरीची संधी देण्यात आली आहे. यामध्ये पालिकेच्या आस्थापनेवर विविध विभागात १६२ विद्यार्थी रुजू झाले असून १२० विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांना पालिकेत प्रशिक्षणासह रोजगाराची संधी मिळाली आहे.

 महापालिकेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत  १२ वी, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी धारण करणाऱ्या सुमारे ५७५ युवकांना प्रशिक्षणासाठी संधी देण्यात येत आहे. पालिकेच्या आस्थापनेवर मंजूर असलेल्या एकूण पदांच्या ५ टक्के पदे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तात्पुरत्या कालावधीसाठी भरण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळवण्यास, उद्यमशीलता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली आहे.

या योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना विद्यावेतन दिले जात आहे. त्यामध्ये १२ वी उत्तीर्ण उमेदवाराला दरमहा ६ हजार , आयटीआय किंवा पदविका उत्तीर्ण उमेदवाराला दरमहा ८ हजार तसेच पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधारक उमेदवाराला दरमहा १० हजार रुपये विद्यावेतन देण्यात येते.  

महापालिकेत सामान्य प्रशासन विभागात लिपिक ३२, शिपाई १८, उद्यान विभागात माळी ४, समाज विकास विभागात फिल्ड सर्वेअर १६, माहिती व तंत्रज्ञान विभागात ३४, डीटीपी ऑपरेटर २, स्थापत्य विभागात सिव्हिल इंजिनिअर ३२, वायरमन ४, इलेक्ट्रिकल इंजिनिअर ४, आरोग्य विभागात ४, आयटीआय १२ असे एकूण १६२ जण रुजू झाले आहेत. तब्बल १२० विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पदासाठी नावनोंदणी केलेली आहे. हे सर्वजण ९ सप्टेंबर २०२४ पासून महापालिकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षण कालावधी ६ महिन्यांसाठी रुजू झाले आहे.

आणखी २५४ पदे भरणार

महापालिकेच्या विविध विभागात केवळ १६२ विद्यार्थी रुजू झाले असून १२० जणांनी नावनोंदणी केलेली आहे. मात्र, फिल्ड सर्व्हे इन्युमरेटर, माळी, मल्टी टास्किंग स्टाफ, स्थापत्य अभियंता अशा विविध पदांसाठी ५७५ उमेदवारांपैकी ३२१ उमेदवार आले होते. त्यामुळे अजून  २५४ पदे भरण्याची आवश्यकता आहे.

युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन महापालिकेत काम करण्यासाठी नोकरीची संधी दिली आहे. यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवण्यात आली आहे. विविध पदांच्या एकूण १६२ उमेदवारांना ६ महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीसाठी नियुक्त केले आहे. या उमेदवारांना शैक्षणिक अर्हतेनुसार तसेच शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार विद्यावेतन देण्यात येणार आहे.

- विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest