पिंपरी-चिंचवड: यंदा तब्बल साडेपाच हजार मूर्तींचे दान

पिंपरी-चिंचवड: पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन प्रशासकीय पातळीवर करण्यात आले होते. त्याचप्रमाणे नागरिकांनीही पर्यावरणासाठी पुढाकार घेतला असून, यंदाच्या गणेशोत्सवात यात मोठा बदल दिसून आला. गतवर्षीपेक्षा अकराशेहून अधिक नागरिकांनी मूर्तिदान उपक्रमात सहभाग घेतला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 16 Sep 2024
  • 01:19 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

यंदा तब्बल साडेपाच हजार मूर्तींचे दान

पालिकेच्या आवाहनाला नागरिकांचा वाढता प्रतिसाद, गतवर्षीच्या तुलनेत अकराशेहून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

पिंपरी-चिंचवड: पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन प्रशासकीय पातळीवर करण्यात आले होते. त्याचप्रमाणे नागरिकांनीही पर्यावरणासाठी पुढाकार घेतला असून, यंदाच्या गणेशोत्सवात यात मोठा बदल दिसून आला. गतवर्षीपेक्षा अकराशेहून अधिक नागरिकांनी मूर्तिदान उपक्रमात सहभाग घेतला. अद्याप ही संख्या केवळ सातव्या दिवशीच्या विसर्जनाची आहे. अनंत चतुर्थीपर्यंत यामध्ये आणखी वाढ होऊ शकणार असून, पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये यंदा हा उपक्रम नवा विक्रम प्रस्थापित करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका ब प्रभाग आणि संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी-चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश विसर्जनाच्या सातव्या दिवसाअखेर ५ हजार ३०६ गणेश मूर्ती दान करण्यात आल्या. गेल्या वर्षी ४ हजार १७२ गणेश मूर्ती  करण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तिदानास प्रतिसाद वाढला आहे. त्याचप्रमाणे प्रतिष्ठांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील वाढ झाली आहे. अनेकांनी या उपक्रमामध्ये स्वयंसेवक काम करण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे

 पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह व महापालिकेचे अन्य प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दीड दिवसापासून हा उपक्रम सुरू करण्यात आला. दरम्यान, दरवर्षीपेक्षा यंदा अधिकाधिक पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याबाबत जनजागृती करण्यात आली होती. जास्तीत जास्त मातीच्या मूर्ती, प्लास्टिक आणि थर्मोकोल टाळावा आणि ध्वनी आणि नदीचे प्रदूषण होऊ नये यासाठी, प्रशासकीय यंत्रणेप्रमाणेच सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील कंबर कसली होती. हा उत्सव सुरू होण्यापूर्वी शहरातील विविध भागात जनजागृती, पदफेरी या माध्यमातून नागरिकांना आवाहन देखील करण्यात आले होते.

दरम्यान, दीड दिवसाच्या विसर्जनाच्या दिवशी सुरुवातच चांगली झाली होती. नागरिकांनी स्वतः या उपक्रमामध्ये येऊन सहकार्य केले. या वेळी साडेपाचशे हून अधिक मूर्ती दान झाले होते. टप्प्याटप्प्यानी ही संख्या वाढून सात दिवसापर्यंत हा आकडा दिवसाला अडीच हजाराच्या पुढे गेला. दरम्यान, आणखीन नववा, दहावा आणि अनंत चतुर्थी हे तीन दिवस विसर्जन होते. त्यामुळे यात आणखीन वाढ होईल, अशी माहिती या उपक्रमाचे आयोजक आणि संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन गायकवाड यांनी दिली.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद
पिंपरी चिंचवड शहरात विविध सामाजिक कार्यकर्त्यांप्रमाणेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देखील या उपक्रमात सहभाग घेतला आहे. त्यामुळे या उपक्रमात मोठी मदत झाली. त्याचप्रमाणे एनसीसीचे ६० विद्यार्थी देखील यामध्ये सहभागी झाले होते. 

दिवस (निर्माल्य)
दीड दिवस ५४४   (२ टन)
पाचवा दिवस ६६८ (२ टन)
सहावा दिवस ११७७ (३ टन)
सातवा दिवस २९१७ (६ टन)
एकूण ५३०६ (१३ टन)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest