पिंपरी-चिंचवड : पोलीस प्रशासन सज्ज; मिरवणुकीत असेल ३२०० पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील मंगळवारी (दि. १७) होणार्‍या गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून त्यानिमित्त विसर्जन घाटांसह ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. विसर्जन मिरवणुकीत ३२०० पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 16 Sep 2024
  • 12:39 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील मंगळवारी (दि. १७) होणार्‍या गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून त्यानिमित्त विसर्जन घाटांसह ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. विसर्जन मिरवणुकीत ३२०० पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुमारे २ हजार १४ सार्वजनिक गणेश मंडळांनी 'श्रीं'ची प्रतिष्ठापना केली. त्यातील सांगवी, तळेगाव दाभाडे यासह काही ठिकाणी सातव्या दिवशी गणेश मंडळांच्या गणपतींचे विसर्जन झाले आहे. उर्वरित सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपतींचे मंगळवारी (दि. १७) विसर्जन होणार आहे. त्यानिमित्त, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह-आयुक्त डॉ. श्रीकांत महावारकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. वसंत परदेशी यांनी बंदोबस्तासाठी नियोजन करण्यात आले आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्वत्र भव्य विसर्जन मिरवणुका निघत असल्याने ठिकठिकाणी गर्दी असते. चिंचवडगावातील चापेकर चौक व पिंपरीतील शगुन चौक या मार्गांवरून मोठ्या संख्येने अनेक गणेश मंडळे मार्गस्थ होतात. तसेच, शहरासह इतर भागांतही मिरवणुकीचे भव्य नियोजन केले जाते. यासह विसर्जन

घाटांवरही भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. मोठ्या उत्साहात लाडक्या गणरायाला निरोप दिला जातो. या दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. वरिष्ठ अधिकारी सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

वाहतूक कोंडी टाळण्याचे नियोजन
मिरवणूक मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांनी वाहतुकीचे चोख नियोजन केले आहे. अनेक मार्गांत बदल केले असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच, पोलिसांनी पथसंचलन, कोम्बिंग ऑपरेशन यासह तडीपार, मोक्का, स्थानबद्ध अशी कारवाईही मोठ्या प्रमाणात केली आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त नेमण्यात आला आहे. काही संशयास्पद आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी केले आहे. 

असा असेल बंदोबस्त

पोलीस उपायुक्त - ६
साहाय्यक पोलीस आयुक्त - ८
पोलीस निरीक्षक - ५३
साहाय्यक पोलीस
निरीक्षक, उपनिरीक्षक - २४५
अंमलदार - २४००
होमगार्ड - ५००
एसआरपीएफ कंपनी - १
बीडीडीएस पथक - १
आरसीपी स्ट्रायकिंग - ११

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest