मुळशी: अखेर धनवेवाडीच्या रस्त्याचे काम सुरू

धनवेवाडी (ता. मुळशी) येथे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला शुक्रवारपासून (१३ सप्टेंबर) सुरुवात झाली. स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्याबाबत हरकत नोंदवल्यामुळे हा रस्ता होऊ शकला नव्हता. अखेर ग्रामस्थांच्या मागणीनुसार आणि त्यांना विश्वासात घेतल्यानंतर रस्त्याचा निर्णय घेण्यात आला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 16 Sep 2024
  • 03:09 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पीएमआरडीएच्या वतीने उभारणार दीड किलोमीटरचा रस्ता, पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पीएमआरडीए यांची संयुक्त कार्यवाही

धनवेवाडी (ता. मुळशी) येथे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला शुक्रवारपासून (१३ सप्टेंबर) सुरुवात झाली. स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्याबाबत हरकत नोंदवल्यामुळे हा रस्ता होऊ शकला नव्हता. अखेर ग्रामस्थांच्या मागणीनुसार आणि त्यांना विश्वासात घेतल्यानंतर रस्त्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात गावच्या वेशीपर्यंत अडीच किलोमीटर रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे येथील कंपनी आणि ग्रामस्थांना दळणवळणाचा मार्ग सुकर झाला आहे.

राष्ट्रीय महामार्गावर सुतारवाडीच्या घाटाच्या उताराला दक्षिण दिशेला धनवेवाडी गाव वसले आहे. राष्ट्रीय महामार्गापासून गावात जाणाऱ्या रस्त्याची गेली अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली होती. या रस्त्याच्या मजबुतीकरणाबाबत स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीचा वाद होता. रस्ता गावापर्यंत व्हावा, याबाबत स्थानिक नागरिकांनी पत्रव्यवहार केला होता. याखेरीज बारा वर्षांपासून सुरू असलेल्या युनायटेड क्रेन कंपनीनेही ही समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. रस्त्याबाबत स्थानिक शेतकऱ्यांच्या काही हरकती होत्या. तसेच, काही वाद होते. त्यामुळे प्रशासनापुढे अडचणी वाढल्या होत्या.

दरम्यान, प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन बाधित शेतकरी आणि ग्रामस्थांबरोबर यापूर्वी दोन वेळा चर्चा केली. तसेच पीएमआरडीएने रस्त्यासाठी लागणाऱ्या जागेची मोजणी केली. अखेर शुक्रवारपासून या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, पीएमआरडीएचे उपअभियंता अमित तिडके, जयेश भदाने, फुलचंद सामंत, बाधित शेतकरी आणि पोलीस कर्मचारी यांनी याबाबत चर्चा केली. स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतले जाईल, असे या चर्चेमध्ये अधिकाऱ्याने सांगितले. नागरिकांची समजूत काढून कामाला अडथळा न आणण्याचे आवाहन केले. तसेच, रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना टीडीआरनुसार योग्य तो मोबदला दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. शेतकऱ्यांनीही सामोपचाराने रस्त्याचे काम करण्यास परवानगी दिली. त्यामुळे या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. हा रस्ता पंधरा मीटर रुंदीचा होणार आहे. एकूण १६०० मीटरच्या या रस्त्यात सुमारे दीड एकर क्षेत्र बाधित होत आहे. तथापि रस्ता होत असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, तसेच कंपनीचे कामगार यांच्यात समाधानाचे वातावरण आहे.

शेतकाढणीनंतर रस्त्याचे काम करावे
पहिल्या टप्प्यामध्ये रस्त्याच्या कामाबाबत स्थानिक नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हरकत नसल्याचे सांगितले आहे. मात्र, काही ठिकाणी शेती असून, या ठिकाणी अद्याप भात शेती काढली नाही. ती काढल्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीत या ठिकाणी काम सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच, गावापर्यंत देखील रस्ता करण्यात यावा, अशी त्यांची मागणी आहे. याबाबत देखील ग्रामस्थांची चर्चा सुरू आहे. साधारण सहा महिन्यांनी हे काम पूर्ण होईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest