मेट्रो कामाची डेडलाईन पाळणार का? - शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होणार?

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम प्रगतिपथावर आहे. मार्च २०२५ पर्यंत या मेट्रो मार्गाचे काम पूर्ण होऊन तो प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे सांगण्यात येते. सद्यस्थितीत ६५ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या १० महिन्यांत जवळपास ३५ टक्के काम पूर्ण करावे लागणार आहे. हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ही मेट्रो वरदान ठरणार आहे.

Pune Metro

संग्रहित छायाचित्र

६५ टक्के काम पूर्ण झाल्याचा पीएमआरडीएचा दावा

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम प्रगतिपथावर आहे. मार्च २०२५ पर्यंत या मेट्रो मार्गाचे काम पूर्ण होऊन तो प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे सांगण्यात येते. सद्यस्थितीत ६५ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या १० महिन्यांत जवळपास ३५ टक्के काम पूर्ण करावे लागणार आहे. हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ही मेट्रो वरदान ठरणार आहे. मात्र, या कामामध्ये गती वाढवण्याची मागणी होऊ लागली आहे.

शिवाजीनगर ते हिंजवडी-माण या तिसऱ्या मेट्रो मार्गाच्या कामासाठी वाकड आणि हिंजवडी (फेज १) या भागात गर्डर आणि खांबावर पिअर कॅम्प बसवण्याचे सुरू आहे. माण-हिंजवडी-शिवाजीनगर हा २३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग आहे. या मार्गावर जवळपास साडे नऊशे पीलर असणार आहेत.  पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्याकडे या प्रकल्पाचे नियंत्रण आहे. केंद्र सरकारच्या मेट्रो रेल धोरण २०१७ अन्वये सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर 'संकल्पना करा, बांधा, अर्थपुरवठा करा, चालवा आणि हस्तांतर करा' मॉडेल अंतर्गत राबवण्यात येत असलेला हा पहिला प्रकल्प आहे.

या तत्त्वावर टाटा समूहाने हे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पासाठी ८ हजार ३१३ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. मध्यंतरी या मेट्रोच्या कामासाठी केंद्र शासनाकडून ४१० कोटी रुपये प्राप्त झाले होते. त्यानंतर या कामाची काहीशी गती वाढली होती.

नोव्हेंबर-२०२३ अखेरपर्यंत मेट्रो लाईन–३ प्रकल्पाचे भौतिक काम सुमारे ५१.१४ टक्के झाले होते. त्यानंतर डिसेंबरअखेर ते काम ५५ टक्केपर्यंत झाले. त्यानंतर २०२४ मध्ये म्हणजेच सद्यस्थितीत हेच काम ६५ टक्क्यांपर्यंत झाल्याचे सांगण्यात येत आहे. नोव्हेंबर २४ पर्यंत चाचण्या पूर्ण होऊन मार्च २०२५ पर्यंत मेट्रो ऑपरेशन सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र, ही डेडलाईन पाळण्यासाठी मेट्रोच्या कामाची गती आणखीन वाढवावी लागणार आहे. त्यातच पावसामुळे या कामावर आणखी व्यत्यय येण्याची शक्यता आहे . त्यामुळे या कामाची डेडलाईन पाळली जाणार का, याबाबत अधिकारी ठाम बोलण्यास तयार नाहीत.

रूळ बसवण्याचे काम सुरू

सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे खांब बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. स्थानक उभारणी सुरू आहे. रुळ बसवण्याचेही काम सुरू झाले आहे. त्याचे आतापर्यंत २५ टक्के काम पूर्णत्वाकडे आहे. वाकड आणि हिंजवडी फेज १ या भागात गर्डर आणि खांबावर पिअर कॅप बसवण्यास वेग आला आहे.

या स्थानकांचा समावेश

मेगापोलीस सर्कल, एम्बेसी क्चाड्रॉन बिझनेस पार्क, डोहलर, इन्फोसिस फेज २, विप्रो फेज २, पाल इंडिया, शिवाजी चौक, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, एनआयसीएमएआर, रामनगर, लक्ष्मीनगर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर, कृषी अनुसाधन, सकाळनगर, विद्यापीठ, आरबीआय, कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर आणि दिवाणी न्यायालय आदी मार्गांचा समावेश आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गापैकी वाकड चौक ते मेगापोलीस सर्कल साडे आठ किलोमीटरचे अंतर असून एकूण नऊ स्थानके असणार आहेत.

मेट्रोच्या कामाला कोणतीही मुदतवाढ देण्यात आली नाही. कामाचा आढावा वेळोवेळी घेण्यात येत आहे. लवकरच ते काम पूर्ण होईल. दिलेल्या वेळेत मेट्रो धावेल.
-रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest