संग्रहित छायाचित्र
नाताळाच्या सुट्या तसेच, थर्टी फर्स्ट पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडसह मावळ, मुळशी परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मावळातील रिसॉर्ट, लोणावळा खंडाळ्यातील हॉटेल आणि पवना नदीकाठी असलेले वेगवेगळे टेन्ट आणि होम स्टेसाठी बुकिंग होऊ लागले आहे. जवळपास ७० टक्के हॉटेलचे बुकिंग पूर्ण झाले असून, येत्या काही दिवसांमध्ये सर्वच हॉटेल बुक होतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परिणामी, वाहतूक पोलिसांसह प्रशासनानेही त्याची तयारी सुरू केली आहे.
सरत्या वर्षाला गुडबाय करण्यासाठी तसेच, नववर्षाला मोठ्या आनंदाने स्वागत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहराप्रमाणे मावळ, लोणावळा, मुळशी, खंडाळा या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रामुख्याने सेकंड होम हाउसफुल होत आहेत. त्याचबरोबर काही खासगी बंगले आणि पवना नदीकाठी असणारे टेन्ट यांनाही पसंती मिळत आहे.
पवन मावळ, राजमाची, लोहगड, विसापूर, कार्ला, कोराईगड हा परिसर, त्याचप्रमाणे लोणावळ्यातील विशेषतः लायन्स पॉईंट, खंडाळा येथील सनसेट आणि पवना नदीमध्ये आकर्षक असलेली बोटिंग पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण या वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे वाहनाचे अपघात आणि दुचाकीचे अपघात देखील वाढत आहेत.
गेल्या महिन्यातच नौका विहार करताना दोघा तरुणांचा पवना नदीत बुडून मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे कुंडमळा, कासारसाई या ठिकाणीही अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पाण्यात उतरताना अथवा रस्त्यावरती वाहन चालवताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड शहरातील मॉल्स, पंच तारांकित हॉटेल या ठिकाणी देखील गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हॉटेल असोसिएशनने तयारी केली आहे. एमटीडीसी आणि पिंपरी-चिंचवड हॉटेल असोसिएशन यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या हॉटेलमध्ये कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. नाताळाच्या पार्श्वभूमीवर काही दुकानांमध्ये वेगवेगळ्या योजनादेखील आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.