संग्रहित छायाचित्र
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड आगाराचे घटत चाललेले उत्पन्न चिंताजनक असून, यंदा शालेय सहलींच्या निमित्ताने आगाराला काहीसा दिलासा मिळाला आहे. चालू वर्षी १६७ बस विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी आरक्षित झाल्या आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत नोव्हेंंबर ते जानेवारी महिन्यातील आकडेवारीमध्ये ५६ हून अधिक बस बुक करण्यात आल्या आहेत.
याविशेष बस सेवेमधून आगाराला २४ लाखांपेक्षा जास्त रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. दुसरीकडे, आगाराला नव्या गाड्यांच्या प्रतीक्षा असून अनेक गाड्यांनी किलोमीटरची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये ही वाहने विद्यार्थ्यांना नेण्यासाठी धोकादायक ठरू शकतात.
महापालिकेच्या बहुतांश शाळांमध्ये सहलींसाठी बस सेवेला प्राधान्य देण्यात येते. खासगी वाहनांपेक्षा शासनाच्या एसटीलाच शाळांची पसंती मिळत आहे. काही दिवसांपुर्वीच शालेय सहल घेऊन जात असलेल्या खासगी वाहनाचा अपघात झाल्याने मोठी दूर्घटना घडली होती. अशा अनेक कारणाने शाळांची पसंती एसटीला असल्याचे दिसून येत आहे.
त्याच प्रमाणे या बसचे दर अन्य खाजगी वाहनापेक्षा कमी असल्याने याला पसंती दिली जाते. शालेय सहलींमध्ये विशेष करून वाई, पाचगणी, श्रीवर्धन, दिवेआगार, पाली, रायगड, अलीबाग, ओझर, शिवनेरी, जेजुरी, प्रतिबालाजी आणि नारायणपुर आदी ठिकांना भेटी दिल्या जात आहेत. दरम्यान, पिंपरी-चिंचवड आगारातून या मार्गाला सर्वाधिक बस आहेत. त्यामुळे एसटी प्रशासनालादेखील हा मार्ग अधिक सोयीचा ठरतो. आगारांमध्ये नव्याने बस उपलब्ध झाल्यास खासगी शाळादेखील एसटी बसने शी आयोजित करण्यास प्राधान्य देऊ शकतील.
गत वर्षीपेक्षा नऊ लाख अधिक कमावले
पिंपरी-चिंचवड आगारातून गेल्या वर्षीपेक्षा यंदा शालेय सहलींच्या माध्यमातून जवळपास नऊ लाख रुपये अधिक कमावले आहेत. २०२३ मध्ये सहलींच्या माध्यमातून १५ लाख ७८ हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. ते यंदा ८ लाख ९८ हजाराने अधिक म्हणजेच २४ लाख ७८ हजार रुपयाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे पुढील दोन महिन्यांसाठी बस आरक्षित केल्या आहेत. डिसेंबर महिन्यात २७ शाळांच्या ८१ बस बुक असून, जानेवारी महिन्यात ३७ शाळांच्या ८१ बस बुक करण्यात आल्या आहेत.
शालेय सहलीच्या सेवेला अधिक चांगल्या प्रकारे प्राधान्य दिले जाते. त्यासाठी चालकांनादेखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे पुढील वर्षाच्याही
सहलीचे बुकिंग होत आहे.
-वर्षा कांबळे, स्थानकप्रमुख, पिंपरी-चिंचवड आगार
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.