संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड शहरात दररोज सुमारे १२०० टनांपेक्षा अधिक कचरा निर्माण होतो. हा कचरा कॉम्पॅक्टर वाहनांद्वारे मोशीतील कचरा डेपो येथे आणला जातो. या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून मोशी कचरा डेपोत वाहून नेण्यासाठी शहरात १६ ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने कचरा स्थानांतरण केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. यापैकी केवळ तीनच स्थानांतरण केंद्रे तयार करण्यात असून, त्यातील केवळ दोनच सध्या कार्यरत आहेत. आवश्यक भूसंपादन नसल्यामुळे १३ घनकचरा स्थानांतरण केंद्रे कागदावरच राहिलेली आहेत.
महापालिका सुरुवातीला १६ ठिकाणी केंद्रे उभारणार आहे. त्यातील बहुतांश केंद्रे लोकवस्तीच्या भागाला लागून असल्यामुळे नागरिकांची याबाबत नाराजी आहे. तरी, केंद्रे उभारण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेचा ताबा मिळवण्यात महापालिकेला यश येताना दिसत नाही. जागाच ताब्यात नसल्यामुळे स्थानांतरण केंद्र उभारण्याचा निर्णय केवळ कागदावरच रखडला आहे. परिणामी, शहरातील घन कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.
दरम्यान, सध्या केवळ तीनच ठिकाणी स्थानांतरण केंद्रे सुरू केली गेली आहेत. त्यापैकी कासारवाडी, भोसरी (गवळीमाथा) आणि काळेवाडी येथे ही केंद्रे तयार केली गेली आहेत. त्यातील काळेवाडी स्थानांतरण केंद्र मागील पाच महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले आहे. कॅप्सुल मशिनचा महत्त्वाचा पार्ट चोरीला गेल्यामुळे हे केंद्र बंद असल्याचे सांगितले जात आहे.
केंद्राकडून ४६ कोटींचा निधी...
घनकचरा स्थानांतरण केंद्र पूर्णतः बंदिस्त असून, कचऱ्याचा परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होत नाही. एक केंद्र उभारण्यासाठी सुमारे २ कोटींचा खर्च अपेक्षित असतो. महापालिकेला केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाकडून आतापर्यंत ४६ कोटी मिळाले आहेत. यापुढील काळातही आणखी निधी मिळणार असल्याची माहिती सह-शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली आहे.
येथे होणार स्थानांतरण केंद्र
कासारवाडी, गवळीमाथा आणि काळेवाडी या तीन ठिकाणी केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. पिंपरी, चोविसावाडी आणि किवळे या ठिकाणी स्थानांतरण केंद्रांचे काम सुरू आहे. पुढील काळात सांगवी, चिंचवड, आकुर्डी आणि बोऱ्हाडेवाडीतील कचरा स्थानांतर केंद्रांच्या कामाला सुरुवात होईल. त्यानंतर इतर भागांत काम सुरू करण्याचा विचार केला जाणार आहे. परंतु, अपेक्षित जागा ताब्यात आली नसल्यामुळे पालिकेकडून केंद्र उभारणीच्या कामाला अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही.
सध्या किवळे, चोविसावाडी, पिंपरी येथे स्थानांतरण केंद्रे उभारण्यात येत आहेत. जसजशी जागा ताब्यात येईल, तसे पुढील स्थानांतरण केंद्रे उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल. ही केंद्रे अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे या स्थानांतरण केंद्रांच्या परिसरात दुर्गंधी येणार नाही.
- संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.