Akurdi Railway Station : आकुर्डी रेल्वे स्थानकात 'बोगी-वोगी' रेस्टॉरंटची सुरुवात; रेल्वेच्या ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ या संकल्पनेंतर्गत उपक्रम

केंद्रीय रेल्वे बोर्डच्या ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ या संकल्पनेंतर्गत आकुर्डी रेल्वे स्टेशन या ठिकाणी 'बोगी-वोगी' रेस्टॉरंटच्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या रेस्टॉरंटची पहिली शाखा मुंबई या ठिकाणी आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 25 Dec 2024
  • 06:57 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

रेल्वे प्रवाशांसह सर्वसामान्य नागरिकांसाठीही २४ तास खुले

केंद्रीय रेल्वे बोर्डच्या ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ या  संकल्पनेंतर्गत आकुर्डी रेल्वे स्टेशन या ठिकाणी 'बोगी-वोगी' रेस्टॉरंटच्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या रेस्टॉरंटची पहिली शाखा मुंबई या ठिकाणी आहे. हे रेस्टॉरंट वापरातून काढून टाकलेल्या रेल्वे डब्यात तयार केले असल्याने बोगी-वोगी असे नाव देण्यात आले आहे. रेल्वे प्रवाशांसह सामान्य नागरिकांनादेखील ही सुविधा आता उपलब्ध असणार आहे.

या रेस्टॉरंटमध्ये ४४ जणांना बसण्याची सोय असून प्रवाशांना शाकाहारी आणि मांसाहारी असा दोन्ही जेवणांचा आस्वाद घेता येतो. त्याचबरोबर चहा, कॉफी, मॉकटेल, नाश्ता, साऊथ इंडियन, चायनीज या खाद्यपदार्थांचा आस्वादही रेल्वे प्रवाशांना घेता येणार आहे. मुंबईतील 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' सुरू झाल्यापासून आजतागायत हजारो प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत यामधील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे हे 'बोगी-वोगी' रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे. ही सेवा प्रवाशांसाठी २४ तास म्हणजेच रात्रीही उपलब्ध राहणार आहे. रेल्वे-थीम असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये आपण स्वादिष्ट आणि हायजेनिक अन्नाचा आस्वाद घेऊ शकता प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी सुरक्षारक्षकाचीही नेमणूक केली आहे. आकुर्डी रेल्वे परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. अनेकदा रात्रीच्या वेळी हॉटेल्स बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या जेवणाची गैरसोय होते. त्यामुळे रेल्वे प्रवाशांबरोबरच येथील स्थानिक विद्यार्थी वर्ग आणि नागरिकांनादेखील या रेस्टॉरंटचा फायदा होईल व तेदेखील आमच्या रेस्टॉरंटच्या जेवणाचा निश्चित आस्वाद घेतील, अशी आशा संचालक चौगुले यांनी यावेळी व्यक्त केली.

पिंपरी चिंचवडच्या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन
'बोगी-वोगी' या ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ची उत्तमरीत्या रंगरंगोटी केली गेली असून आतमध्ये अतिशय सुंदररित्या आसनव्यवस्था, डेकोरेशन करण्यात आले आहे. दर्शनी भागात भक्ती शक्ती शिल्प, मोरया गोसावी मंदिर, रावेत येथील जगद्गुरू तुकाराम महाराज हँगिंग ब्रिज, आणि पिंपरी-चिंचवड पुणे मेट्रो, आकुर्डी रेल्वे स्टेशन यांचे स्कायलाईन तयार करण्यात आली आहे. तसेच पुणे स्टेशनच्या निर्मितीचे जुने छायाचित्र व त्या संदर्भातील माहितीही ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest