संग्रहित छायाचित्र
विद्यार्थ्यांना लहानपणापासून कचरा व्यवस्थापनाची सवय लागावी, त्यांची कचरा व्यवस्थापनावर जनजागृती व्हावी, याकरिता महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये झिरो वेस्ट कचरा मोहीम राबवण्यात येणार आहे. यामध्ये शून्य कचरा प्रकल्प राबविण्यासाठी पुढील १६ शाळांची निवड करण्यात आली. या प्रस्तावास महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समिती सभेत मान्यता दिली.
शहरात स्वच्छ पिंपरी-चिंचवड शहर अभियान राबवण्यात येत आहे. महापालिकेच्या शाळा कचरामुक्त व्हाव्यात, याकरिता प्राथमिक व माध्यमिक शाळा स्तरावर कचरा मुक्त शाळा (झिरो वेस्ट शाळा) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाचा भाग म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत झिरो वेस्ट शाळा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जागृती करून त्यांच्यात लहानपणापासूनच कचरा व्यवस्थापनाची कौशल्य विकसित करण्यास मदत होणार आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये तीन महिन्यांमध्ये एकूण ४ टप्प्यांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार असून त्यासाठी शाळांना निधी देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एकूण १०५ शाळा या उपक्रमाअंतर्गत कचरामुक्त करण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या १०५ शाळांपैकी मे. आसरा फाउंडेशन या संस्थेला झिरो वेस्ट (शून्य कचरा) शाळा उपक्रम राबविण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील ८ शाळा प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ८ शाळा, दुसऱ्या टप्प्यात १६ शाळा, तिसऱ्या टप्प्यात १६ शाळा , चौथ्या टप्प्यात १६ शाळा यानुसार १०५ शाळांपैकी ५६ शाळा झिरो वेस्ट (शून्य कचरा) करण्यात आला आहेत.
यामध्ये अ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील निगडी येथील विद्यानिकेतन मुलांची व मुलींची शाळा, ब क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील काळेवाडी मुलांची व मुलींची शाळा, क क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील खराळवाडी येथील उर्दू शाळा, जाधववाडी येथील उर्दू प्राथमिक शाळा, ड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील कस्पटे वस्ती शाळा, ई क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील भोसरी येथील मुलांची व मुलींची शाळा, फ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील निगडी येथील मुलांची व मुलींची शाळा, क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील खिंवसरा पाटील मुलींची शाळा, कर्मवीर भाऊराव पाटील शाळा, थेरगाव उर्दू शाळा, ह क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील छत्रपती शाहू महाराज प्राथमिक शाळा, संत तुकारामनगर प्राथमिक शाळा या शाळांचा समावेश असून या शाळेमध्ये झिरो वेस्ट प्रकल्प राबवण्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
या बैठकीत मंजूर झालेले विषय...
शहरातील विविध परिसरातील रस्त्यांची आधुनिक पद्धतीने दुरुस्ती करणे, शहरात विविध ठिकाणी पाईपलाईन टाकण्यासाठी अडथळा येणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या उच्च व लघुदाब वीजवाहिन्या स्थलांतरित करणे , विविध प्रभागातील स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे आदी विषयांच्या खर्चास प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.