संग्रहित छायाचित्र
राज्य प्रमाणेच पिंपरी शहरातील प्रत्येक वाहनाला आता हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (एचएसआरपी) बसवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. मात्र, त्यासाठी निवडलेल्या सेवा पुरवठादाराची पिंपरी-चिंचवडमध्ये अद्याप सेंटर निश्चित झाले नसल्याचे समोर आले आहे. मात्र, आरटीओकडून वाहनचालकांना या नंबरप्लेटची घाई केली जात आहे. संबंधित केंद्राची निश्चिती झाल्यानंतर दिलेल्या संकेतस्थळावर ते प्रसिद्ध केले जाणार आहेत. त्यानंतरच हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसवण्याचे काम सुरु होणार आहे.
मोटार वाहनांवर हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट (एचएसआरपी) बसवण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. वाहनांच्या नंबरप्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे आदी कारणांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्यासाठी पिंपरी -चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात रिअल मॅझॉन इंडिया लिमिटेड या सेवापुरवठादाराची नियुक्ती केली आहे. त्यांच्या https://hrspmhzohe2.in या संकेतस्थळावर बुकिंग करावे लागणार आहे. शुल्क भरणे, पुर्वनियोजित वेळ राखून ठेवणे आणि त्यानंतर नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. या सेवा पुरवठादाराकडून लवकरच पिंपरी-चिंचवड शहरात सेंटर निश्चित केले जाणार आहेत. त्या सेंटरची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतरच नंबरप्लेट बसवण्याची कार्यवाही केली जाणार आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत अंतिम मुदत आहे. त्या आधी ही नंबरप्लेट बसवण्याचे आवाहन आरटीओने केले आहे.
अशी आहे एचएसआरपी नंबरप्लेट
सर्व एचएसआरपी नंबरप्लेट्सवरील शब्दांचा आकार आणि परिमाण समान आहे. तसेच, या उच्च-सुरक्षित नंबरप्लेट्स वाहनांशी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जोडलेल्या असतात, त्यामुळे पुन्हा वापरणे अशक्य आहे. निळ्या रंगात क्रोमियम-आधारित हॉट-स्टॅम्प केलेला अशोकचक्रचा होलोग्राम असणार आहे. हा होलोग्राम २० मिमी लांबी आणि २० मिमी रुंदीचा आहे, जो प्लेटच्या वरच्या डाव्या कोपर्यात स्थित आहे. खालच्या डाव्या कोपर्यात लेझर तंत्रज्ञानाद्वारे एक अद्वितीय १०-अंकी स्थायी ओळख क्रमांक (पिन) कोरलेला आहे. नोंदणी क्रमांकाची पहिली दोन अक्षरे राज्य कोड दर्शवतात, खालील दोन अंक जिल्हा कोड दर्शवतात. डाव्या बाजूला मध्यभागी आयएनडी (इंडिया) अशी राष्ट्रीय ओळख असून अशोकचक्र होलोग्रामच्या खाली ब्रँड असतो.
या प्रक्रियेसाठी सेवापुरवठादाराकडून सेंटर निश्चित केले जातील. संबंधित सेंटरवर जाऊन वाहनधारकांना कार्यवाही करता येईल. ३१ मार्च २०२५ पर्यंत नंबरप्लेट बसवून घ्याव्यात.
-राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.