भामा आसखेड जलवाहिनीचे काम कूर्मगतीने; पालिका प्रशासनाने घेतली ठेकेदाराची झाडाझडती

भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी हाती घेतलेल्या जलवाहिनीचे काम संथगतीने सुरू आहे. या कामाची चार वर्षांची मुदत संपली तरी काम अपूर्णच आहे. या जलवाहिनीचे काम केवळ ४८ टक्के झाले आहे. जलवाहिनीचा ठेकेदार आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची कामाच्या आढावा बैठक घेतली.

संग्रहित छायाचित्र

काळ्या यादीत का टाकू नये, अशीही केली विचारणा

भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी हाती घेतलेल्या जलवाहिनीचे काम संथगतीने सुरू आहे. या कामाची चार वर्षांची मुदत संपली तरी काम अपूर्णच आहे. या जलवाहिनीचे काम केवळ ४८ टक्के झाले आहे. जलवाहिनीचा ठेकेदार आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची कामाच्या आढावा बैठक घेतली. यामध्ये ठेकेदाराची झाडाझडती घेत तुम्हाला काळ्या यादीत का टाकू नये, असा इशाराही महापालिकेच्या वतीने दिला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी भामा आसखेड धरणात १६७ एमएलडी पाण्याचा कोटा राखीव करण्यात आला आहे. यासाठी पाणीपुरवठा विभागाने २०२० मध्ये निविदाप्रक्रिया राबवून जलवाहिनी टाकण्याचे काम ऑफशोअर इंडिया लि. या ठेकेदाराला दिले. नवलाख उंबरेपासून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्यात येत आहे. 

जलवाहिनीचे संपूर्ण काम १६२ कोटी रुपयांचे आहे. काम सुरू करण्याचा आदेश १५ डिसेंबर २०२० रोजी दिला होता. कामाची मुदत १५ डिसेंबर २०२४ अशी चार वर्षांची होती. मात्र, या मुदतीत १९ किलोमीटरपैकी केवळ नऊ किलोमीटर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. सोमवारी (१६ रोजी) जलवाहिनीचा ठेकेदार आणि पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, प्रभारी कार्यकारी अभियंता दीपक पाटील, सल्लागार आदी अधिकाऱ्यांसमवेत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी बैठक घेतली.

या कामाच्या संथ गतीवरून जांभळे पाटील यांनी नाराजी व्यक्त करीत ठेकेदाराची झाडाझडती घेतली. ठेकेदाराला कामासाठी दिलेली चार वर्षांची मुदत संपली आहे. त्यामुळे तुम्हाला काळ्या यादीत का टाकू नये, असा इशाराही दिला. दरम्यान, आंद्रा धरणातील पाणी नवलाख उंबरे येथून एकाच जलवाहिनीतून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यात येणार आहे. या मार्गात साडेसात किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. मात्र, या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. सध्या इंद्रायणी नदीतून निघोजे बंधाऱ्यातून महापालिका ८० एमएलडी पाणी उचलत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest