'पब्जी' खेळता खेळता अब्रूशीच खेळला

पब्जी गेम खेळताना झालेल्या ओळखीतून युवकाने तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात पुरंदर येथील २३ वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खेड तालुक्यातील २१ वर्षीय तरुणीने याबाबत फिर्याद दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Tue, 13 Jun 2023
  • 08:27 am
'पब्जी' खेळता खेळता अब्रूशीच खेळला

'पब्जी' खेळता खेळता अब्रूशीच खेळला

चॅटिंगचा पर्याय निवडून वाढवली ओळख, प्रत्यक्ष भेटीत दाखवले लग्नाचे आमिष; बलात्कारानंतर लग्नाच्या वचनाकडे दुर्लक्ष

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

पब्जी गेम खेळताना झालेल्या ओळखीतून युवकाने तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात पुरंदर येथील २३ वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खेड तालुक्यातील २१ वर्षीय तरुणीने याबाबत फिर्याद दिली आहे.

गेल्या वर्षभरापूर्वी संबंधित तरुणीची पब्जी गेम खेळताना आरोपी तरुणाशी ऑनलाईन ओळख झाली होती. त्यानंतर गेममध्ये असलेल्या चॅटिंगचा पर्याय निवडत दोघे गप्पा मारू लागले. सातत्याने गेम खेळत असल्याने दोघांची ओळख वाढत गेली. त्यानंतर दोघेही विविध ठिकाणी भेटू लागले होते. हिंजवडी येथील एका हॉटेलमध्ये आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून प्रथम बलात्कार केला आणि त्यानंतर जेजुरी तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याचे तक्रारदार तरुणीने दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या सगळ्या प्रकारानंतर तरुणीने आरोपीला लग्न करण्याबाबत विचारले असता, 'तू सारखी आजारी असतेस. त्यामुळे माझ्या आईला तू पसंत नाहीस' असे म्हणत आरोपीने टाळायला सुरुवात केली. त्यानंतर 'तुझे यापूर्वी अन्य एका मुलाबरोबर अफेअर होते, असे सांगत त्याने लग्नाला नकार दिला. १३ मे २०२३ पर्यंत मागील वर्षभरात हा सगळा प्रकार घडला असून, तरुणीने पुणे ग्रामीण पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली होती. त्यांनी गुन्हा दाखल करून या प्रकाराला हिंजवडीमधून सुरुवात झाल्याचे सांगत हा गुन्हा तपासासाठी हिंजवडी पोलिसांकडे वर्ग केला आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान पब्जी गेम खेळण्यावरून लहान मुलांमध्ये भांडणे, आत्महत्या, खून असे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांकडून फोन लोकेशन, कॉल हिस्ट्री तसेच व्हॉट्स ॲप तपासणी केली जाते. यापूर्वी सांगवी येथील योगेश जगताप खून प्रकरणातील आरोपींनी घटनेपूर्वी आणि खून करून पसार झाल्यावर एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी पब्जी गेममधील चॅटिंगचा वापर केला होता. असाच प्रकार अनेक गुन्ह्यांत घडल्याचे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या तपासातून उघड झाले होते. त्यानंतर आता या गेममधील चॅटिंगचा पर्याय निवडून झालेल्या ओळखीतून थेट बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. देशभरात आणि परदेशात देखील पब्जी गेम खेळताना गुन्हे घडले आहेत. त्यामुळे अनेक देशात या गेमवर बंदी घालण्यात आली आहे. भारतातही पब्जीवर बंदी आहे. परंतु केंद्र सरकारने "पब्जी मोबाईल केआर" या कोरियन व्हर्जनला तत्त्वतः मान्यता देत हे सुरक्षित असल्याचे २०२१ मध्ये जाहीर केले होते. त्यानंतर या गेमसाठीची "एपीके" फाइल डाउनलोड करणे बेकायदेशीर नसल्याचेही घोषित झाले होते. त्यामुळे ही गेम खेळणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest