पवना धरणात उरला फक्त २० टक्के पाणीसाठा
पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मावळ तालुक्यातील पवना धरणात जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या धरणात केवळ २०.२४ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे, पिंपरी चिंचवडकरांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाणीपुरवठ्याच्या वाढत्या तक्रारींमुळे सर्व भागाला समान पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने २५ नोव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. साडेतीन वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असून पाण्याच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. उंचावरील भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला. कमी दाबाने, पुरेशा पाणी येण्याच्या तक्रारी पूर्णपणे घटल्या आहेत.
महापालिका दिवसाला ५८० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी पुरवठा करत आहे. सध्या पवना धरणात २०.२४ टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढा आहे. गतवर्षी आजच्या तारखेला पवना धरणात २२.०६ टक्के पाणीसाठा होता. तर गतवर्षी पाणलोट क्षेत्रात दोन हजार 777 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे तीन वेळा धरण शंभर टक्के भरले होते. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.